गुड बाय म्हणत अनुराग कश्यप यांनी केले ट्विटर अकाउंट डिलीट

वृत्तसंस्था
रविवार, 11 ऑगस्ट 2019

अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहिलेल्या अनुरागच्या आई-वडीलांना आणि मुलीला सतत धमकीचे फोन, मॅसेज येत असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

मुंबई : केंद्र सरकारला लक्ष्य करणारे बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी सतत येत असलेल्या धमक्यांमुळे आपले ट्विटर अकाउंट डिलीट केले आहे. त्यांनी अकाउंट डिलीट करण्यापूर्वी दोन पोस्ट लिहून यामागील कारण सांगितले आहे.

अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहिलेल्या अनुरागच्या आई-वडीलांना आणि मुलीला सतत धमकीचे फोन, मॅसेज येत असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की ज्यावेळी तुमच्या आई-वडीलांना धमकीचे फोन येऊ लागतात आणि तुमच्या मुलीला ऑनलाइन धमकी मिळते, त्यावेळी सारेच जाणतात की या मुद्द्यावर कोणी उघडपणे बोलायला तयार होत नाही. हे कुठलंही कारण किंवा तर्क नाही. भामटे राज्य करतील आणि भामटेपणा हीच जीवन जगण्याची नवीन पद्धत होईल. सगळ्यांना या नव्या भारतासाठी शुभेच्छा.

तो दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, की तुम्हा सगळ्यांना यश आणि सुख मिळावे ही इच्छा. हे माझं अखेरचं ट्विट आहे. कारण मी माझं ट्विटर अकाऊंट बंद करत आहे. मला माझे विचार निर्भीडपणे मांडता येत नसतील तर मी आता बोलतच नाही. गुड बाय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anurag Kashyap quits Twitter citing threats to his parents and daughter