दोन हजाराची नोट घेता का?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

म्हसळा शहरात ८ ते १० दिवसांपासून दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण वाढल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. कोणताही ग्राहक वस्तूचे पैसे देताना प्रथम दोन हजारांच्या नोटा देत आहे.

म्हसळा (वार्ताहर) : म्हसळा शहरात ८ ते १० दिवसांपासून दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण वाढल्याचे चित्र बाजारात दिसत आहे. कोणताही ग्राहक वस्तूचे पैसे देताना प्रथम दोन हजारांच्या नोटा देत आहे. दोन हजारांच्या नोटांबाबत सोशल मीडिया, व्हॉट्‌सॲपवर सतत येणारे संदेश, बातम्यांमुळे सर्वसाधारण नागरिक व ग्राहकांमध्ये मोठे गैरसमज होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दोन हजाराच्या नोटा चलनात आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र, किरकोळ व्यापारी या नोटा चक्‍क नाकारत असून सुटे पैसे देण्यासही नकार देत आहेत. 

काही दिवसांपासून सोशल मीडिया, व्हॉट्‌सअपवर दोन हजार रुपयांची नोट बंद होणार असल्याचा संदेश फिरत आहे. त्याचीच धास्ती नागरिकांनी घेतली आहे. मागील नोटाबंदीप्रमाणे या वेळीही संकट येऊ नये म्हणून नागरिक त्यांच्याजवळ असलेल्या नोटा बाजारात चलनासाठी आणत आहेत. कोणतीही वस्तू खरेदी केली की दोन हजाराची नोट ते पुढे करतात. मात्र, व्यापारी किंवा दुकानमालक या नोटा घेण्यास नकार देत असून कोणी सुटे मागितले तरी देत नाहीत. यामुळे नागरिक हतबल झाले आहेत.

हा होता व्हायरल मेसेज
भारतीय रिझर्व्ह बॅंक १ जानेवारी २०२० पासून नवीन एक हजाराची नोट जारी करणार असून, २ हजाराची नोट बंद करणार आहे, असे समाज माध्‍यमांमधून सर्वत्र प्रसारित होत आहे. १० दिवसांत केवळ ५० हजार रुपये बदलण्याची मुभा ग्राहकांना असणार आहे. नागरिकांकडे २ हजारांच्या नोटांचे जास्त पैसे असल्यास ते बदलता येणार नाही, असेही सांगण्यात येत आहे.

बॅंक काऊंटरवर पेमेंटच्या वेळी दोन हजारांच्या नोटा सक्तीने दिल्या जात नाही. ग्राहकांकडे दोन हजारांच्या नोटा असल्यास ते आपल्या खात्यांत रक्कम जमा करू शकतात.
- मॅनेजर, स्टेट बॅंक, म्हसळा

म्हसळा बाजारपेठेत ग्राहक सर्रास दोन हजारांच्या नोटा देत असतात. आमच्याकडे सुट्टे असल्यास अवश्‍य देतो. आमच्याजवळील नोटा आम्ही बॅंकेत भरण्यास देतो.
- राहुल शेठ, कापड व्यापारी

चार दिवस कापणीचे काम केले, तरी मजुरीपोटी किमान २ ते ३ हजार होतात. मालक बंद्या नोटा देतात. आम्ही काय करायचे
- रामा दादा शीतप, शेतमजूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anyone want 2 thousand Note?