मच्छीमारांना नुकसानभरपाईसाठी "ऍप'चा आधार 

मच्छीमारांना नुकसानभरपाईसाठी "ऍप'चा आधार 

मुंबई - जाळ्यात अडकलेल्या सागरी जीवांना जाळे तोडून सोडल्यास मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकार पुढे सरसावले आहे. त्याबाबतची योजना त्वरित व सुलभतेने अंमलात आणण्यासाठी कांदळवन विभागाने ऍपची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांत ऍप तयार होणार असल्याची माहिती कांदळवन विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. वासुदेवन यांनी दिली. ऍपसाठी दोन ते तीन लाखांचा खर्च येणार आहे. 

वाढत्या मासेमारीच्या फटक्‍यात डॉल्फिन, कासव, व्हेल आणि शार्क सध्या मच्छीमारांच्या जाळ्यात अडकू लागले आहेत. मच्छीमार आपले जाळे फाडून त्यांना पुन्हा समुद्रात सोडून देतात. जाळे फाडल्यामुळे मच्छीमारांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. समुद्री जीवांना जीवनदान देणाऱ्यांना नुकसानभरपाईसाठी "मरिन रिस्पॉण्डंटस्‌'च्या सततच्या मागण्यांनंतर दोन आठवड्यांपूर्वीच सरकारने एका अध्यादेशाच्या माध्यमातून 25 हजारांची नुकसानभरपाई मच्छीमारांसाठी मंजूर केली. कांदळवन विभागाच्या निगराणीखाली मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळणार आहे. त्यासाठीच्या नियम व शर्ती अगोदरच मच्छीमारांना लागू करण्यात आल्या आहेत. परंतु योजनेचा लाभ मच्छीमारांपर्यंत पोहोचावा म्हणून मोठ्या प्रमाणात जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्याचीही सूचना सरकारकडून करण्यात आली आहे. त्यानुसार नव्या वर्षात स्वयंसेवक आणि वनाधिकारी यांच्या वतीने ऍपच्या माध्यमातून असा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार आहे, अशी माहिती एन. वासुदेवन यांनी दिली. 

अशी होईल ऍपची मदत  
ऍपमधून तातडीने छायाचित्रांची नोंदणी केल्यास घटनास्थळाचा अक्षांश व रेखांशही नोंदवला जाईल. त्यामुळे घटना समुद्रात नेमकी कुठे घडली, याची माहिती कांदळवन विभागाला मिळेल. 
ऍपमुळे नुकसानभरपाईच्या प्रक्रियेला जलद गतीने सुरुवात होईल. 

पुरावा नसल्याचा फटका 
व्हिडीओ नसल्याने सिंधुदुर्गातील देवगडमधील मच्छीमार किरण खवळे यांना नुकसानभरपाईच्या फायद्यापासून मुकावे लागणार आहे. आठवडाभरापूर्वीच 22 फुटांचा व्हेल मासा त्यांच्या जाळ्यात अडकला होता. जाळी तोडताना व्हिडीओ काढायचा राहून गेल्याने कांदळवन विभागासमोर खवळे यांना व्हेल माशाला सुखरूप सोडल्याचा पुरावा दाखवण्यात अडचणी येत आहेत. जाळी तोडल्याने नुकसान तर झालेच; परंतु म्हाकुळ मासेही समुद्रात पुन्हा सोडले गेले. सर्व नुकसान 25 हजारांच्या पुढे असल्याची खंत खवळे यांनी व्यक्त केली. अपुऱ्या माहितीअभावी नुकसानभरपाईसाठी खवळे यांना अर्ज करता आला नाही. आता कांदळवन विभागाकडून होणाऱ्या जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेऊन अर्जाची प्रक्रिया नक्कीच समजून घेऊ. जेणेकरून भविष्यात नुकसानभरपाई मिळेल, असा आशावाद खवळे यांनी व्यक्‍त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com