पालिका शाळांतील 219 गुरुजींचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज 

पालिका शाळांतील 219 गुरुजींचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज 

मुंबई : पदपथावरील, परप्रांतातून आलेल्या, कचरावेचक, गजरे विकणारी आदी शाळांबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पालिकेच्या शाळांमार्फत प्रयत्न केले जातात. या विद्यार्थ्यांसह सर्वच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याची जबाबदारी पालिकेच्या शिक्षण विभागाने शिक्षकांवरच टाकली आहे. त्यासाठी बनवण्यात आलेल्या शास्तींतर्गत (नियमावली) 25 निकषांची पूर्तता न करणाऱ्या शिक्षकांवर वेतनवाढ रोखण्यापासून निलंबनापर्यंत कारवाई होणार आहे. प्रशासनाने आतापर्यंत सुमारे 200 शिक्षकांची वेतनवाढ रोखल्याचेही समजते. त्यामुळे या शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यातून सुटका करून घेण्याकरिता वर्षभरात 219 शिक्षकांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. 

"प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र मोहिमें'तर्गत पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी पालिकेने हे निकष तयार केले आहेत. त्याअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला "अ' श्रेणी मिळण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे लागणार आहेत. विद्यार्थ्याला ही श्रेणी मिळाली नाही तरी शिक्षकांवर कारवाई होणार आहे. दरम्यान, ही शास्ती केवळ मराठी आणि हिंदी माध्यमांच्या शाळांनाच लागू करण्यात आल्याच्या शिक्षकांच्या तक्रारी आहेत. 

नियमावली जाचक! 
शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी शिक्षकांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यांना शाळेत टिकवून ठेवणेही अवघड काम असते. त्यांचे शाळेला दांड्या मारण्याचे प्रमाणही अधिक असते. दप्तर, गणवेश, छत्री, बूट आदी मोफत मिळणाऱ्या वस्तू घेण्यासाठी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे ही मुले अभावानेच "अ' श्रेणी मिळवू शकतात. त्यामुळे ही शास्ती जाचक असून ती बनवण्यापूर्वी संबंधितांनी शाळाबाह्य मुलांसह सर्वच मुलांच्या अडचणींचा विचार केलेला नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. 

राज्यभरात कुठेही अशी शास्ती लागू नाही. त्यामुळे मुंबई पालिकेतच ती का लागू करण्यात आली. या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. 
- के. पी. नाईक, अध्यक्ष, मुंबई महानगरपालिका शिक्षक सेना. 

बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार कर्तव्य पार पाडण्यात कसूर करणाऱ्या शिक्षकांवर सेवानियमान्वये शिस्तभंगाची कारवाई होईल; मात्र ती करण्यापूर्वी शिक्षकांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. 
- महेश पालकर, शिक्षणाधिकारी, मुंबई महानगरपालिका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com