खड्डे भरण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणूक करा : रवींद्र वायकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

या महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम सुरू असताना आवश्‍यक त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी एकाही ठेकेदाराविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे खड्ड्यांचे काम अन्य कंत्रादाराला देऊन आलेल्या खर्चाची वसुली जुन्या कंत्राटदाराकडून वसूल करण्यात यावी. 

- रवींद्र वायकर, पालकमंत्री, रत्नागिरी

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांकडून या रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यात येत नसल्यामुळे येथील खड्डे बुजवण्यासाठी स्वतंत्ररीत्या कंत्राटदारांची नेमणूक करण्यात यावी. यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद न करता या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ज्या ठेकेदारांना देण्यात आले आहे, त्यांच्या एकूण कामाच्या मक्‍त्याच्या रकमेतून हा निधी वळता करण्यात यावा, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील वर्षापासून सुरू आहे. हे काम ठेकेदारांना काही अटी व शर्तीवर देण्यात आले आहे. त्यानुसार या कामाचे आदेश मिळाल्यापासून चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत अस्तित्त्वात असणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, तसेच चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर 15 वर्षांपर्यंत नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती करावी असे बंधनकारक आहे. त्यासाठी ठेकेदारांना देण्यात आलेल्या कंत्राटामध्ये खड्डे बुजवण्याच्या रकमेचाही समावेश करण्यात आला आहे. 

खड्डे बुजवणे ठेकेदाराला बंधनकारक 

पावसाळ्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गावर पडणारे खड्डे बुजवणे ठेकेदाराला बंधनकारक आहे, परंतु ठेकेदारांकडून कोणतेही काम केले जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले असून यामुळे अनेक प्रवाशांना आपले प्राणही गमवावे लागल्याच्या घटनाही घडत आहेत. 
 

Web Title: Appoint an independent contractor to fill the pits says Ravindra Waikar