ऍप्रेंटिसना तीन पाळ्यांत काम करता येणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 एप्रिल 2018

मुंबई - उद्योगांमध्ये काम करणाऱ्या ऍप्रेंटिसना (शिकाऊ उमेदवार) तीन पाळ्यांमध्ये काम करता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातल्या प्रमुख उद्योग समूहाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत त्यांची ही मागणी मान्य केली.

मुंबई - उद्योगांमध्ये काम करणाऱ्या ऍप्रेंटिसना (शिकाऊ उमेदवार) तीन पाळ्यांमध्ये काम करता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातल्या प्रमुख उद्योग समूहाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत त्यांची ही मागणी मान्य केली.

राज्यात विविध उद्योगांमध्ये ऍप्रेंटिसचे प्रमाण अत्यंत कमी आहे. राज्य सरकारने यासाठी सुरू केलेल्या पोर्टलवर केवळ दोन लाख शिकाऊ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. हे प्रमाण सात लाखांपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांची बैठक बोलावली होती. सात लाखांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उद्योजकांनीही मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

या उद्योग समूहांकडेही शिकाऊ उमेदवारांची नोंदणी झालेली आहे. त्याबाबतची माहिती ते उद्योग विभागाला देणार आहेत. उद्योग समूहांमध्ये शिकाऊ उमेदवारांचे प्रमाण 10 टक्‍के असते ते 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवणे आवश्‍यक आहे, असे मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्‍त केले.

बैठकीला राज्यातील गोदरेज, टाटा यांसारख्या उद्योजक समूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते. फिक्‍की या उद्योग संघटननेच्या प्रतिनिधींचीही हजेरी होती.

http://www.apprenticeship.gov.in पोर्टलवर नोंदणी करणे आवश्‍यक आहे, त्यावर नोंदणीची संख्या कमी आहे. अधिकाधिक उद्योजकांनी यावर नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी उद्योजकांना केले. ऍप्रेंटिसशिपचे प्रमाण वाढविण्यासाठी उद्योगांनी पुढाकार घेतल्यास उद्दिष्टपूर्ण करणे सहज शक्‍य होईल, असा विश्‍वासही मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

Web Title: Apprentice can work in three shifts devendra fadnavis