रमेश कदम यांच्यावरील दोषारोपाला मंत्रिपरिषदेची मान्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

मुंबई - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधी रूपयांच्या गैरव्यवहारातील मुख्य आरोपी आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे आमदार रमेश कदमच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यास आज राज्य मंत्रिपरिषदेने मंजुरी दिली. त्या मंजुरीमुळे रमेश कदमच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. विद्यमान विधानसभा सदस्याच्या विरोधातील दोषारोपपत्राला मंत्रिपरिषदेने मंजुरी देण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे.

लोकसेवक असलेल्या आमदाराच्या विरोधात दोषारोपपत्र सादर करण्यासाठी मंत्रिपरिषदेची मान्यता घ्यावी लागते. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यासंदर्भात राज्य सरकारला शिफारस केली होती. त्यानुसार आजच्या बैठकीत रमेश कदमसह महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक श्रावण बावणे, तत्कलीन जिल्हा व्यवस्थापक सुग्रीव गायकवाड तसेच लिपीक सुजित पाटील यांच्या विरोधात दोषारोपपत्र सादर करण्यास मंत्रिपरिषदेने मान्यता दिली. या मान्यतेनंतर हा प्रस्ताव पुन्हा राज्यपालांना सादर केला जाणार आहे.

Web Title: The approval of the Council of Ministers on Ramesh Kadam