कल्याणमधील लोकग्राम पादचारी पुलाला मंजुरी 

कल्याणमधील लोकग्राम पादचारी पुलाला मंजुरी 

कल्याण : कल्याण पूर्व रेल्वे स्थानक परिसरात असलेला लोकग्राम पादचारी पूल नव्याने बांधण्याच्या कामाला कल्याण-डोंबिवली महापालिका स्मार्ट सिटी बोर्डाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे 38 कोटी 57 लाख रुपये खर्चाचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी "सकाळ'ला दिली. हा पूल धोकादायक झाल्याने 19 मे 2019 पासून रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. 

कल्याण पूर्वमधील लोकग्राम, चक्की नाका, जिम्मी बाग, हाजी मलंग पट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना कल्याण रेल्वे स्थानकात येण्यासाठी सोयीचा ठरणारा लोकग्राम पादचारी पूल 1992-93 मध्ये सुरू झाला. रेल्वेच्या हद्दीतून हा पूल जात असल्याने पालिका रेल्वेला पुलाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी देत होती.

पूल धोकादायक झाल्याने रेल्वेने 19 मेपासून तो बंद केल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी पाठपुरावा केल्याने पालिका आणि रेल्वे अधिकारी वर्गासोबत बैठक घेण्यात आली होती. या वेळी नवीन लोकग्राम पुलाच्या बांधकामाचा खर्च नेमका कोणी करायचा, यावर चर्चा करण्यात आली. 

दरम्यान स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळ (एसकेडीसीएल) सदस्यांची बैठक सोमवारी (ता. 30) पार पडली. यात लोकग्राम पुलाच्या बांधकामासाठी 38 कोटी 57 लाख खर्चाच्या निधीला मंजुरी दिली. स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत हा निधी मंजूर झाला आहे. बैठकीतील इतिवृत्त आल्यावर रेल्वेशी संपर्क साधला जाईल. रेल्वे जर हा पूल बांधत असेल, तर तो निधी रेल्वेकडे वर्ग करू अथवा त्यांनी मंजुरी दिल्यास स्मार्ट सिटी अंतर्गत पादचारी पुलाचे काम आम्ही करू, अशी माहिती पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिली. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com