दिखाऊ काम करू नका; यिनच्या भावी मंत्र्यांना अपूर्वा पालकर यांचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

मुंबई - स्मार्ट काम करा; दिखाऊ नको. नेतृत्व करताना तुम्ही कशासाठी उभे राहिला आहात, हे आधी कळले पाहिजे. सर्वसामान्यांना यंत्रणेची माहिती नसल्यामुळे घोळ होतो. त्यासाठी तुमच्या अभ्यासाचा पाया पक्का करा, असा सल्ला सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरच्या (एसआयएलसी) सीईओ अपूर्वा पालकर यांनी यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) कार्यशाळेत रविवारी दिला.

मुंबई - स्मार्ट काम करा; दिखाऊ नको. नेतृत्व करताना तुम्ही कशासाठी उभे राहिला आहात, हे आधी कळले पाहिजे. सर्वसामान्यांना यंत्रणेची माहिती नसल्यामुळे घोळ होतो. त्यासाठी तुमच्या अभ्यासाचा पाया पक्का करा, असा सल्ला सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटरच्या (एसआयएलसी) सीईओ अपूर्वा पालकर यांनी यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) कार्यशाळेत रविवारी दिला.

यशवंतराव चव्हाण केंद्रामध्ये "यिन'च्या जिल्हाप्रमुखांच्या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात कलागुणांचा विकास अर्थात स्किल डेव्हलपमेंट विषयाने झाली. अपूर्वा पालकर यांनी यिनच्या विद्यार्थ्यांना सहज-सोप्या शब्दांत व्यवस्थापन व कलागुणांच्या विकासाची सांगड सांगितली. आगामी काळात जगभराच्या तुलनेत भारतामध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक असणार आहे. त्या शक्तीला योग्य दिशा मिळाली पाहिजे. तुम्ही राज्यभरातून महाविद्यालयीन निवडणुकांद्वारे पोहचला आहात. तेव्हा भावी मंत्रिमंडळामध्ये नेतृत्व करताना तुम्ही कशासाठी उभे राहिला आहात, हे कळले पाहिजे. त्यासाठी कलागुणांचा विकास झाला पाहिजे. अभ्यासाची जोड दिली पाहिजे, असे पालकर यांनी सांगितले.

जगभरात तरुणांच्या विकास निर्देशांकात (युथ डेव्हलपमेंट इंडेक्‍स) भारताचा 113 वा क्रमांक लागत असल्याचे सांगत कलागुणांच्या विकासाला वाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यिनच्या मंत्रिमंडळाची जबाबदारी खांद्यावर घेणार असल्याने कार्यशाळेमध्ये राज्य सरकारच्या उच्च शिक्षण, कृषी, जलसंधारण व इतर खात्यांची प्राथमिक ओळख करून देण्यात आली.

गटचर्चा
प्रत्येकी 13 विद्यार्थ्यांचे पाच गट तयार करून कृषी, शिक्षण, पर्यटन, महामंडळ व ग्रामविकास या खात्यांमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्‍न व त्यावरील उपायांवर गटचर्चा करण्याची सूचना दिली गेली. राज्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी चर्चेत मुद्दे मांडले. त्यानंतर प्रत्येक गटातील दोन विद्यार्थ्यांना सादरीकरण करण्यास सांगण्यात आले. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर अपूर्वा पालकर यांनी समाधान व्यक्त करत आणखी तयारी करण्याचा सल्ला दिला.

समन्वयकांचे कौतुक
कमी कालावधीमध्ये यिन समन्वयक म्हणून ठसा उमटवलेल्या विद्यार्थ्यांचा अभिनेते व दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सूरज पाटील (मुंबई), तेजस पाटील (नाशिक), जगदीश पवार (नाशिक), गणेश घोलप (मुंबई), मानसी मोडघरे (वर्धा) यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Apurva Palkar speech in YIN