मिर्ची पावडर टाकून चोरी करणारी टोळी जेरबंद

सुचिता करमरकर
मंगळवार, 25 जून 2019

कल्याण : अंगावर खुजली पावडर किंवा मिरची पावडर टाकून लक्ष विचलित करून हातातील पैशाची बॅग पळवणाऱ्या आंतरराज्य टोळीला कल्याण पोलिसांनी जेरबंद केले आहे. टोळीतील 20 ते 30 वयोगटातील 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कल्याण : अंगावर खुजली पावडर किंवा मिरची पावडर टाकून लक्ष विचलित करून हातातील पैशाची बॅग पळवणाऱ्या आंतरराज्य टोळीला कल्याण पोलिसांनी जेरबंद केले आहे. टोळीतील 20 ते 30 वयोगटातील 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी या आरोपींकडून 25 मोबाईल तसेच पंचवीस वेगवेगळ्या कंपनीची सिम कार्ड जप्त केली आहेत. कल्याण पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने एका राष्ट्रीयीकृत बँकेबाहेर संशयास्पद स्थितीत घुटमळत असलेल्या एका आरोपीला ताब्यात घेतले आणि अवघ्या चोवीस तासांत या टोळीच्या मुसक्या आवळल्या. 
   
कल्याण शहरातील मुरबाड रोड परिसरात असलेल्या एका राष्ट्रीयीकृत बँकेबाहेर इलियाराज केशवराज (वय 30) हा संशयास्पद फिरत असताना गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांना आढळला. त्याच्याजवळ असलेली मोटरसायकल भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात वापरलेली गेल्याची माहिती असल्याने पथकाने त्याला ताब्यात घेतले. या आरोपीने सुरुवातीला केवळ तामिळ येत असल्याचे सांगितल्याने दुभाषाच्या सहाय्याने पोलिसांनी त्याच्याकडून माहिती घेतली.  त्या माहितीनुसार, त्याच्या टोळीचा मुखिया सालोमन लाजर गोगुला आणि इतर साथीदार एका राष्ट्रीयकृत बँकेजवळ रोख रक्कम लुटण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी संजय बाबू नायडू (वय 25) बेंजीमन इरग्दीनल्ला (वय 26), दासू येड्डा (वय 28), सालोमन लाजर गोगुला (वय 29),  अरुण कुमार पेटला (वय 24),  राजन गोगुल (वय 46), मोशा याकूब मोशा (वय 30),  डॅनियल अकुला (वय 25) या आरोपींना अटक केली.  हे सर्व आरोपी आंध्र प्रदेश तसेच तमिळनाडू येथे राहणारे आहेत. या सर्व आरोपींकडून तीन मोटर सायकल, तीन कोयते, दोन चाकू, नायलॉन दोरी, हेल्मेट, रिफ्लेक्टर जॅकेट, बेचक्या, लोखंडी गोळ्या, काचकटर, स्क्रू ड्रायव्हर, कटावणी जप्त करण्यात आले. याशिवाय आरोपींकडून मिरची पावडर तसेच खुजली पावडरही जप्त करण्यात आली. आरोपींकडून 25 मोबाईल हॅन्डसेट तसेच 25 मोबाईल सिम कार्ड ही जप्त करण्यात आली आहेत. आरोपी गुन्हा केल्यानंतर प्रत्येक वेळेस सिम कार्ड बदलून एकमेकांच्या संपर्कात राहत असल्याचे कल्याण पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. 

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत या टोळीच्या विरोधात दहा ते बारा गुन्हे दाखल आहेत. याशिवाय या टोळीने औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव, नागपूर, गोंदिया तसेच राज्यात बागलकोट, विशाखापटनम याठिकाणीही गुन्हे केले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाळंदे, पोलीस हवालदार सुनिल पवार, पोलीस नाईक दीपक गडगे, नरेंद्र बागुल, अमोल गोरे, भावसार, रविंद्र हासे, शिपाई चिंतामण कातकडे, सुनील गावित यांच्या पथकाने ही कारवाई केली.
     

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arrested gang who thef by using chilli powder