गणेशाच्या आगमनापूर्वी खड्डेदुरुस्ती होणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

मुंबई - श्री गणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे प्रशासनाने पूर्ण भरून घ्यावेत, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी तसेच रस्त्यांवरील वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करावी, अशा सूचना महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी पालिका आणि पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत. 

मुंबई - श्री गणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे प्रशासनाने पूर्ण भरून घ्यावेत, वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी तसेच रस्त्यांवरील वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करावी, अशा सूचना महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी पालिका आणि पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत. 

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आयोजनाबाबत समन्वय समितीच्या विविध संघटनांची संयुक्त बैठक गुरुवारी पालिका मुख्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. महापौरांच्या हस्ते श्री गणेशोत्सव माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही झाले. या वेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, पालिका आयुक्त अजोय मेहता, श्री सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती (उपनगरे)चे अध्यक्ष लीलाधर डाके, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर, अखिल भारतीय सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे प्रमुख कार्यवाह सुरेश सरनोबत, उपआयुक्त आणि गणेशोत्सवाचे समन्वयक नरेंद्र बरडे आदी उपस्थित होते. 

गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी ऑनलाईन पद्धत यावर्षीपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुरू केली असून गणेश मंडळांनी परवानगीसाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मेहता यांनी केले. गणेशाच्या आगमनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम प्रशासनाकडून पूर्ण केले जाईल. गणेशमंडळांनी संबंधित विभागाचे उपायुक्‍त व सहायक आयुक्‍त यांच्याकडे तक्रार नोंदविल्यानंतर लगेच खड्डे बुजविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. 

जेली फिशपासून सावधान 
चौपाट्यांवर जेलीफिशचे प्रमाण बघता प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनीही आपापल्या स्तरावर काळजी घ्यावी, असे आवाहन आयुक्त अजोय मेहता यांनी केले. 

Web Title: Before the arrival of Ganesha the potholes will be repaired