उन्हाळ्याची चाहूल लागताच "शुगर किंग' तुमच्या भेटीला...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

उन्हाळ्याची चाहूल लागल्याने शरीराला थंडावा देणारी कलिंगड बाजारात मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहेत. वाशीच्या घाऊक बाजारात कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सद्यस्थितीत दररोज 40 ते 45 गाड्या माल बाजारात दाखल होत आहे.

नवी मुंबई : उन्हाळ्याची चाहूल लागल्याने शरीराला थंडावा देणारी कलिंगड बाजारात मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहेत. वाशीच्या घाऊक बाजारात कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सद्यस्थितीत दररोज 40 ते 45 गाड्या माल बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे कलिंगडाच्या भावात घसरण झाली असून, घाऊक बाजारात आठ ते 10 रुपये किलोने विकली जात आहेत. 

ही बातमी वाचली का? हवे होते 200 कोटींचे कर्ज... गमावले 20 लाख

उन्हाचा पारा चढू लागला की बाजारात कलिंगडाला मागणी वाढते. बाजारात 10 ते 15 गाड्या होणारी कलिंगडाची आवक, सध्या 40 ते 45 गाड्या इतकी होत आहे. हे कलिंगड प्रामुख्याने सांगली, सोलापूर, गुलबर्गा, अक्कलकोट येथून येत आहेत. पूर्ण उन्हाळ्याभर हा हंगाम चालणार असल्याची माहिती कलिंगडाचे व्यापारी भरत मोरे यांनी दिली. गडद हिरव्या रंगाचे कलिंगड "शुगर किंग' या नावाने ओळखले जातात. नावाप्रमाणेच त्यांची चवही साखरेसारखी असते. फिक्कट हिरवे पट्टे असणारी लांबट आणि आकाराने मोठे असणारे कलिंगड "नामधारी' या नावाने ओळखले जातात. फ्रूट सलाड आणि ज्यूस बनवण्यासाठी हे कलिंगड मोठ्या प्रमाणात वापरले जातात. सध्या आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने घाऊक बाजारात सध्या "शुगर किंग' जातीचे कलिंगड सहा ते आठ, तर नामधारी आठ ते 10 रुपये किलोने विकली जात आहेत. किरकोळ बाजारात ही कलिंगडे पंधरा ते अठरा रुपये किलोने विकली जात आहेत. 

ही बातमी वाचली का? बीकेसीच्या धर्तीवर लवकरत केसीपी...

निर्यातही जोरात 
नामधारीची 10 किलो वजन भरेल इतकी मोठी कलिंगडे बाजारात येत आहेत. किरकोळ बाजारात त्यांना मागणी आहे, पण परदेशात निर्यातीसाठीसुद्धा या कलिंगडांना मागणी वाढत आहे. सध्या दुबई, कतार यांसारख्या आखाती देशात ही कलिंगडे मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहेत. येणाऱ्या 45 पैकी 10 ते 15 गाड्या कलिंगडे निर्यातीसाठी जात आहेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The arrival of water melon increased in vashi market