मन चिंब पावसाळी...

हेमंत जुवेकर
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

आठवणी अशा बरसतात 
जसा पाऊस...
ओलेत्या पानांचे गीत 
तू नको गाऊस...

आठवणी अशा बरसतात 
जसा पाऊस...
ओलेत्या पानांचे गीत 
तू नको गाऊस...
पावसाच्या निमित्ताने अनेक कवींची प्रतिभा अशी न्हाती-धुती होते. बहर येतो त्यांच्या प्रतिभेला. अर्थात कवी असलात-नसलात तरी तुमच्या आठवणीत पाऊस असूच शकतो. सुरुवात केलीत आठवायला तर कदाचित पाऊस सुरू होईलही मनात, आठवणींचा. पाऊस आणि आठवणींचा संबंध तसा खूप जुना; पण त्यातलं नातं किती दाट असतं याचा प्रत्यय नुकताच आला. गोव्यात सध्या सेरेडीपीटी कला-महोत्सव सुरू आहे. १६ पासून सुरू झालेला हा महोत्सव २३ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवात साऱ्याच कलांचं एकत्रीकरण झालंय. दृश्‍यकला, रंगकला आणि हस्तकला अशा कलेच्या सगळ्याच पैलूंच्या सादरीकरणाचा प्रयत्न या महोत्सवात दिसला. एक विभाग चक्क विज्ञानाचाही होता.

विज्ञान हीसुद्धा एक कलाच असल्याचा दावा एका विचारवंतानं केला होता, त्याची आठवण यानिमित्तानं झाली. विज्ञानाचं कलेशी नातं सांगणारा एका विभागातल्या एका दालनात हा आठवणीतला पाऊस चक्क भेटला. अगदी कडकडून.

मनातला पाऊस चक्क प्रत्यक्षातही पडू शकतो, याचा प्रत्यय आला. इथे जाणाऱ्या प्रत्येकाला आपल्या आठवणीतला पाऊस किती जोरदार आहे, हे चाचपण्याची संधी होती. करायचं होतं हेच, की डोक्‍यावर सेन्सर लावून एका विशिष्ट ठिकाणी उभं राहायचं. जिथे आपल्या डोक्‍यावर अनेक शॉवरची गर्दी असते. त्यामुळे तिथे छत्री घेऊनच उभं राहावं लागतं. (नाही, पण तुम्ही भिजाल म्हणून नाही... खरंतर तुमच्या मनातल्या आठवणीत भिजलात तरच पाऊस पडेल; पण तसा तो पडला, तर डोक्‍यावरचे ते सेन्सर भिजतील ना... त्या सेन्सर लावणाऱ्या मुलीने अगदी स्पष्ट सांगितलं तसं. बहुतेक त्या अगोदर पावसाच्या आठवणींनी बेभान झालेल्या कुणीतरी त्या कृत्रिम पावसातही चिंब होण्याचा प्रयत्न केला असणार...)

तिथे उभं राहिल्यावर खूप आल्या पावसाच्या आठवणी मनात आणि पडला हो चक्क पाऊस. आधी वाटलं की मुद्दाम आपल्याला बरं वाटावं म्हणून केले असतील शॉवर सुरू. म्हणून आठवणी थांबवल्या. तर थांबला.

जोरदार पावसाची कल्पना केली तर खरंच जोरदार पडायला लागला. तिथे असलेल्या मुलीला विचारलं, हे कसं होतं? तिने विज्ञानाच्या परिभाषेत समजावलं. कपाळावर असलेल्या काही स्नायूंवर आठवणींचा काही ताण येतो म्हणे. तसा तो आला की सेन्सर्स ऑन होतात आणि पडतो पाऊस. खरं तर खूप काही सांगितलं तिने. कळलं ते इतकंच.

मागोमाग एक परदेशी मुलगी गेली त्या पावसाच्या प्रदेशात. म्हटलं पाहूया तिच्या आठवणी किती स्ट्राँग आहेत त्या. पण बराच वेळ झाला तरी पाऊस पडेना. मग तिला सांगण्यात आलं की, मनातली खूप पावसाची आठवण ताजी कर म्हणून. तिच्या सोबत असलेल्या मैत्रिणीने काहीतरी ओरडून सांगितलं तिला. थोड्या वेळाने तिच्या छत्रीवर टपटप सुरू झाली नि मागोमाग झालाच ना जोरात सुरू पाऊस. इतक्‍या जोरात की त्या आवाजानं तिचं कॉन्सन्ट्रेशन भंगलं नी पटकन बंदच झाला तो पाऊस. ती मुलगी बाहेर आली. तिच्या मैत्रिणीने विचारलं, भिजलीस का, तिने जोरजोरात नकारार्थी मान हलवली. पण तिने मैत्रिणीकडून रुमाल घेतला मागून. 

आठवणीमुळे सुरू झालेला कृत्रिम पाऊस थांबला असला, तरी तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. तिचा आठवणीतला पाऊस थांबायला तयार नव्हता...

Web Title: artical hemand juvekar