आशिष रावलानी याने जिद्दीने मिळवले यूपीएससी परिक्षेत यश

दिनेश गोगी
रविवार, 6 मे 2018

आपण अपयशाने खचून न जाता जिद्द ठेवणे हे यशाचे द्योतक आहे, यश हे मिळतच असते.

उल्हासनगर - नापास झाल्यावरही खचून न जाता तिसऱ्या प्रयत्नात आशिष रावलानी याने यूपीएससी परीक्षा पास केली. उल्हासनगरच्या इतिहासात प्रथम सिंधी भाषिक आयएएस अधिकारी असा मानाचा तुरा त्याने रोवला. त्याचे काल शनिवारी शहरात आगमन झाले. त्यानिमित्त आशिषचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

आई सेवानिवृत्त शिक्षिका आणि वडील बँकेमध्ये अधिकारी अशा उच्चशिक्षित वातावरणात तयार झालेल्या आशिषने 2015 व 2016 मध्ये यूपीएससीची परीक्षा दिली. मात्र त्याच्या पदरी निराशा आली. आईवडिलांकडून प्रेरणा मिळालेल्या आशिषने राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबध या विषयातून तिसऱ्या टर्म मध्ये यूपीएससीचा अभ्यास करून उल्हासनगरमधील पहिला आयएएस अधिकारी बनण्याचा बहुमान मिळवला.

आपण अपयशाने खचून न जाता जिद्द ठेवणे हे यशाचे द्योतक आहे, यश हे मिळतच असते, असे मत आशिष रावलानी यांने यावेळी व्यक्त केले.

गोलमैदान मधील निरंकारी भवन येथे त्याचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. महापौर मीना आयलानी, शिवसेनेचे चंद्रकांत बोडारे, विरोधीपक्षनेते धनंजय बोडारे, सभागृहनेते जमनादास पुरस्वानी, नगरसेवक डॉ.प्रकाश नाथानी, दिलीप गायकवाड, नाना बागुल, मनसेचे संजय घुगे, बंडू देशमुख, मनोज शेलार, सचिन बेनके, मैनऊद्दिन शेख, मुकेश सेतपलानी, विक्रांत पाटील, निखिल पाटील, तन्मेश देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. 

Web Title: ashish rawlani has success in upsc exam