बिनकामाचे भाजप सरकार बदला - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

भिवंडी - जनतेला अच्छे दिनचे वायदे करून झुलवत ठेवणाऱ्या बिनकामाच्या भाजप सरकारला देश व राज्यातून बदलण्याची वेळ आली आहे. त्यासाठी जनतेने सज्ज राहावे, असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी भिवंडीत झालेल्या जाहीर सभेत केले. 

भिवंडी - जनतेला अच्छे दिनचे वायदे करून झुलवत ठेवणाऱ्या बिनकामाच्या भाजप सरकारला देश व राज्यातून बदलण्याची वेळ आली आहे. त्यासाठी जनतेने सज्ज राहावे, असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी भिवंडीत झालेल्या जाहीर सभेत केले. 

भिवंडी शहर महापालिकेची निवडणूक 24 मे रोजी होत असल्याने प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज सायंकाळी शहरातील दर्गारोड येथील दिवाणशाह दर्ग्याच्या मैदानात कॉंग्रेसच्या वतीने जाहीर सभा झाली. या वेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत प्रदेश सरचिटणीस मुजफ्फर हुसेन, जिल्हाध्यक्ष शोऐब गुड्डू खान, माजी खासदार सुरेश टावरे, माजी महापौर जावेद दळवी, माजी आमदार रशीद ताहीर मोमीन, मोहम्मद अली खान, प्रदीप राका, वकार मोमीन आदी मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला खोटी आश्‍वासने देऊन अच्छे दिनचा भरोसा दिला होता; मात्र तीन वर्षांचा काळ पूर्ण झाला तरी अद्याप नागरिकांच्या बॅंक खात्यात 15 लाखच काय 15 रुपयेही जमा झाले नाहीत. उलट खाते उघडण्यासाठी 100 रुपये भरावयास लावले. त्यानंतर नोटाबंदी करून सर्वसामान्यांना बॅंकेच्या रांगेत उभे केले. तसेच इंधन दरवाढ करून जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव वाढवले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुश्‍कील झाले आहे. कॉंग्रेसने यंत्रमाग व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करून अनुदान दिले होते; मात्र भाजप सरकारने वीज, यार्नच्या किमतीत दरवाढ करून यंत्रमाग व्यवसाय बुडवल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला. 

भिवंडीत कॉंग्रेसची सत्ता आल्यास शहराचा कायापालट करू. नागरिकांना भेडसावणारा पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आदी प्रश्‍न सोडवून भिवंडीला नवीन स्वरूप देऊ, असे आश्‍वासन चव्हाण यांनी दिले. भिवंडी शहराच्या विकासासाठी कॉंग्रेसला बहुमताने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार रसिक प्रदीप राका यांच्या कार्यालयाचे उद्‌घाटन अशोक चव्हाण यांनी केले. या वेळी माजी आमदार रशीद ताहीर मोमीन, शहर जिल्हाध्यक्ष शोऐब गुड्डू यांनीही मनोगत व्यक्त केले.

Web Title: Ashok Chavan public meeting in Bhiwandi