रात्रीचे जेवण आता रात्री आठनंतर

रात्रीचे जेवण आता रात्री आठनंतर

आश्रमशाळेला जनरेटर पुरवणार; सायंकाळीच भोजन देण्याची पद्धत मोडीत काढणार
मुंबई - आश्रमशाळांमध्ये रात्रीच्या वेळी वीज नसल्याचे कारण देत विद्यार्थ्यांना सायंकाळीच रात्रीचे जेवण देण्याची पद्धत लवकरच निकाली निघणार आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या दोन जेवणाच्या वेळेतील अंतर कमी व्हावे, यासाठी सर्व आश्रमशाळांमध्ये जनरेटर पुरविले जाणार असून, रात्रीचे जेवण 8 नंतर देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

आश्रमशाळा असणाऱ्या बहुतांश भागांत भारनियमन असल्याने सायंकाळी 5 वाजता विद्यार्थ्यांना जेवायला दिले जात असल्याने त्यांच्या रात्रीच्या आणि सकाळच्या जेवणात 15 तासांचे अंतर पडत असल्याने मुले भुकेने हैराण होत होती. याकडे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूची कारणे आणि प्रतिबंध करण्यासाठी नियुक्‍त करण्यात आलेल्या समितीने गंभीर आक्षेप घेतले होते, याचे वृत्त "सकाळ' मध्येही प्रसिद्ध झाले होते. गेल्या 15 वर्षांत आदिवासी आश्रमशाळेतील 1 हजार 463 विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले, त्याबाबतचा अहवाल कालच डॉ. सुभाष साळुंखे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राज्यपालांना केला होता. या अहवालात करावयाच्या उपाययोजनांवर कशा प्रकारची कार्यवाही करण्यात येईल, याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिवांना सादर करण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे, नाशिक, अमरावती आणि नागपूर अपर आयुक्‍तांना निर्देश देण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेत बदल करण्याच्या सूचना आदिवासी विकास विभागाचे सचिव राजगोपाल देवरा यांनी दिले आहेत.

शासकीय आश्रमशाळांमध्ये 250 जनरेटर यापूर्वीच दिलेले आहेत, मात्र डिझेलची व्यवस्था नसल्याने ते बहुतांश बंद असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. जनरेटर असलेल्या शाळांना डिझेलसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच इतर ठिकाणी जनरेटर खरेदी करता येणार नसले तरी भाड्याने घेण्याची परवानगी देण्यात येईल. विजेची व्यवस्था झाली तर मुलांना रात्रीचे जेवण संध्याकाळच्या ऐवजी रात्रीच देता येईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वेळेत उपचार मिळाले आणि अहवालात सूचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली, तर 70 टक्‍के विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखता येतील, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. तसेच आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास मृत्यूची तपासणी प्रकल्प अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी व तहसीलदार यांची समिती करणार आहे. तसेच 24 तासांच्या आत ही समिती प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्याला सादर करेल, असे निर्देशही सचिवांनी दिले.

पंधरा वर्षांत दीड हजार मृत्यू
2001 ते 2016 या पंधरा वर्षांत शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेत 1 हजार 463 आदिवासी विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले आहेत, त्यामध्ये 820 मुले, तर 643 मुली आहेत. दुर्देवाची गोष्ट म्हणजे या मृत्यू झालेल्या जवळपास 67 टक्‍के मुलांच्या मृत्यूची कारणेच समजलेली नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com