अश्विनी बिद्रे खुन खटला; न्यायालयाकडून आरोपीची कानउघडणी

अश्विनी बिद्रे खुन खटला; न्यायालयाकडून आरोपीची कानउघडणी


पनवेल : अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या सुनावणीसाठी पवनेल येथील सत्र न्यायालयात उपस्थित राहणारे अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांना या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याने व त्याच्या मुलीने न्यायालयाच्या आवारात बघून घेण्याची धमकी दिल्याची लेखी तक्रार राजू गोरे यांनी न्या. राजेश अस्मर यांच्याकडे शुक्रवारी केली.

या तक्रारीनंतर न्या. अस्मर यांनी शुक्रवारी सुनावणीच्या वेळी अभय कुरुंदकर याची कानउघडणी करून न्यायालयाच्या आवारात त्याची व त्याच्या नातेवाईकांची कुठल्याच प्रकारची अरेरावी खपवून घेतली जाणार नसल्याचे कुरुंदकर याला सुनावले.
 पनवेल येथील सत्र न्यायालयात सध्या अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाची सुनावाणी सुरू असून सध्या अश्विनी बिद्रे यांचे बंधू आनंद बिद्रे यांची उलटतपासणी सुरू आहे. या सुनावणीसाठी ता. ८ रोजी राजू गोरे हे पनवेल सत्र न्यायालयात उपस्थित होते.

या वेळी राजू गोरे हे सरकारी वकिलाच्या कार्यालयासमोर पोलिस अधिकाऱ्यांसमवेत उभे असताना, न्यायालयातून पोलिस बंदोबस्तात आपल्या मुलीसह बोलत येणाऱ्या अभय कुरुंदकर याने राजू गोरे यांना रागाने पाहून, हे तक्रार करतात, यांना बघून घेतलेच पाहिजे, अशी बडबड केली. तसेच त्याच्या मुलीनेदेखील काकाला सांगून याला एखाद्या गुन्ह्यात अडकविण्याची भाषा सर्वांसमोर केल्याचे राजू गोरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.  या प्रकारानंतर राजू गोरे यांनी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांच्याशी सल्लामसलत करून शुक्रवारी न्या. राजेश अस्मर यांच्याकडे आपले निवेदनवजा तक्रार सादर केली.

बिद्रे यांच्या पतीने दिली तक्रार
 आरोपी कुरुंदकर हा कुठल्याच पोलिसांचे ऐकत नसल्याचे व पोलिसांसोबत तो अरेरावीची भाषा करून आजही कुरुंदकर हा पोलिस अधिकारी असल्यासारखा वागत असल्याचे राजू गोरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. कुरुंदकर याचा भाऊ संजय कुरुंदकर हा पुणे पोलिस दलात कार्यरत आहे. त्याने यापूर्वी बिद्रे हत्याकांडाच्या तपासादरम्यानसाक्षीदारांना धमकावून हाकलून लावले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com