हवाईसुंदरी हत्येप्रकरणी मुंबईतून तिघे ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

मोहम्मद खान याने 5 जुलैला रिया हिच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. 6 जुलैला उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. दिल्लीतील मानसरोवर परिसरात घडलेली ही घटना "सीसीटीव्ही'मध्ये कैद झाली होती. हत्येनंतर खान पळून गेला. भर रस्त्यात रियावर हल्ला होत असतानाही भीतीने कोणीही तिला वाचवण्यासाठी गेले नव्हते.

मुंबई - दिल्लीतील हवाईसुंदरी रिया गौतम (वय 21) हिच्या हत्येप्रकरणी फरारी असलेल्या तिघा संशयितांच्या येथील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी (ता. 7) रात्री मुंबईत मुसक्‍या आवळल्या. या तिघांना दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मोहम्मद आदिल बन्ने खान (वय 23), जुनैद सलीम अन्सारी (19) आणि फाजील राजू अन्सारी (18) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना वांद्रे येथील बेहरामपाडा परिसरात हे तिघे सापडले. खान हा हत्येप्रकरणी मुख्य आरोपी असून, तो दिल्लीतील मानसरोवर येथील रहिवासी आहे. जुनैद आणि फाजिल हे उत्तर प्रदेशातील अलीगड येथील रहिवासी आहेत. तीन संशयित वांद्रे येथे लपल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार शोधमोहीम राबवून या तिन्ही आरोपींना पकडण्यात आले.

मोहम्मद खान याने 5 जुलैला रिया हिच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. 6 जुलैला उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. दिल्लीतील मानसरोवर परिसरात घडलेली ही घटना "सीसीटीव्ही'मध्ये कैद झाली होती. हत्येनंतर खान पळून गेला. भर रस्त्यात रियावर हल्ला होत असतानाही भीतीने कोणीही तिला वाचवण्यासाठी गेले नव्हते. रिया आणि खान यांची वर्षभरापासून ओळख होती; पण काही दिवसांपासून रिया त्याच्यापासून दूर राहत होती. त्यामुळे खान तिचा पाठलाग करत असे. याला कंटाळून रियाने एप्रिलमध्ये खानच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली होती. त्या वेळी पोलिस खानच्या घरी पोचले होते. मात्र, तो गुजरातला पळून गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 5 जुलैला खान परतला. त्याने रियाचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र रियाने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे खानने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. जुनैद व फाजिल यांनी त्या वेळी खानला मदत करण्यासाठी रियावर पाळत ठेवली होती. घटनेनंतर तिघेही वांद्रे येथील नातेवाइकाच्या घरी लपले होते.

Web Title: Aspiring air hostess Riya Gautam stabbed to death