भिवंडीत शुल्लक वादातून हत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

धामणगाव परिसरातील एका केशकर्तनालयातील दोघा इसमांमध्ये क्षुल्लक कारणांमुळे वाद झाल्याने एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. 

भिवंडी:  धामणगाव परिसरातील एका केशकर्तनालयातील दोघा इसमांमध्ये क्षुल्लक कारणांमुळे वाद झाल्याने एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. 
केशकर्तनालयात काम करणाऱ्या मेव्हण्याने सख्ख्या भावजीची धारदार हत्याराने भोसकून हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत आरोपीस अटक केली आहे. 
अमिन जलील शेख (वय 40) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. त्याचे धामणगाव येथे ए-वन केशकर्तनालय असून त्या दुकानात अरमान सलीम शेख (वय 30) हा देखील मृतासोबत काम करीत होता. मात्र, अरमान यास दारू व नशेच्या पदार्थांचे व्यसन होते.

त्यामुळे अमिन त्याच्या व्यसन करण्यास मनाई करत असे. त्यावरून दोघांमध्ये मध्यरात्री कडाक्‍याचे भांडण झाले. या वेळी अरमान याने रागाच्या भरात आपला मेव्हणा अमिन याच्या डोक्‍यात धारदार वस्तूने प्रहार केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तालुका पोलिस ठाण्यात अरमान विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अरमानला भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. याप्रकरणी अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. हजारे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assassination in a heated argument in bhivandi