फटाक्‍यांच्या धुरामुळे दम्याच्या रुग्णांत वाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

मुंबई - दिवाळीतील फटाक्‍यांच्या प्रदूषणामुळे यंदाही डॉक्‍टरांकडे येणाऱ्या दम्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे. दिवाळीच्या दिवसांत वातावरणात येणारा थंडावा दम्याच्या रुग्णांसाठी त्रासदायक ठरतो. त्यातच फटाक्‍यांचा धूर पसरून जास्त त्रास होतो. दम्याबरोबरच ब्रॉंकायटिस, घशातील जंतुसंसर्ग, श्‍वसननलिकेच्या खालच्या बाजूला संसर्ग किंवा त्रास होणे अशा तक्रारी घेऊन रुग्ण येतात, अशी माहिती जसलोक रुग्णालयातील फुप्फुसतज्ज्ञ डॉ. जलील परकार यांनी दिली.

वातावरणात झालेल्या बदलापेक्षा फटाक्‍यांचा धूर आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या कणांमुळे त्रास झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. दिवाळीच्या तीन दिवसांत 40 रुग्ण आले असून, फटाक्‍यांच्या धुरामुळे होणाऱ्या दम्याच्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे भाटिया रुग्णालयातील छातीरोगतज्ज्ञ डॉ. आदित्य अगरवाल यांनी सांगितले. हवेत वाढलेल्या प्रदूषणामुळे घसा दुखणारे, तसेच आवाज बसलेले रुग्णही येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

अशी काळजी घ्यावी
धूर आणि धुळीची ऍलर्जी असल्यास घराबाहेर जाणे टाळावे.
बाहेर जाणे आवश्‍यक असल्यास नाकातोंडावर रुमाल बांधावा किंवा मास्क लावावा.
दम्याच्या रुग्णांनी या दिवसांत औषधे नियमित घ्यावीत.
घरात एअरप्युरिफायर असल्यास ते साफ करून घ्यावेत.
फटाके लावताना तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधावा.

Web Title: asthma patient increase by firework smoke