अथर्व शिंदे हत्येप्रकरणी मित्रांची चौकशी सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

मुंबई - अथर्व शिंदे हत्येप्रकरणी त्याच्या १२ मित्रांची आरे पोलिस कसून चौकशी करत आहेत. चौकशीत १२ जणांनी मद्यप्राशन केल्याचे उघड झाले. अथर्वला छातीत मार लागल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले; मात्र त्याचा नेमका मृत्यू कसा झाला, हे न्याय सहायक प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक नरेंद्र शिंदे यांचा अथर्व हा मुलगा आहे. सोमवारी (ता. ७) त्याच्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त आरे कॉलनीतील बंगल्यात निवडक मित्रांकरिता पार्टी होती. ते सर्व जण बंगल्यात झोपले होते. सकाळी त्यांना अथर्व दिसला नाही. शोधमोहिमेदरम्यान बुधवारी (ता. ९) त्याचा मृतदेह टेकडीजवळील जंगलात सापडला. त्याच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर सूज होती. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन तो विच्छेदनाकरिता सिद्धार्थ रुग्णालयात पाठवला. त्याच्या छातीत मार लागल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले. डॉक्‍टरांनी तो शवविच्छेदन अहवाल पोलिसांना दिला आहे; पण नेमके त्याच्या मृत्यूचे कारण न्याय सहायक प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. 

सीसी टीव्ही फुटेजचा आधार
तपासादरम्यान आरे पोलिसांनी १२ जणांना चौकशीकरिता ताब्यात घेतले. काही तास त्या सर्वांची कसून चौकशी केली. पोलिसांना एक महत्त्वपूर्ण सीसी टीव्ही फुटेज मिळाले आहे. त्या फुटेजमध्ये अथर्व बंगल्यावरून उडी मारत असल्याचे दिसत आहे. चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आलेल्या १२ जणांना गुरुवारी (ता. १०) रात्री वैद्यकीय तपासणीकरिता सिद्धार्थ रुग्णालयात पाठवण्यात आले होते. वैद्यकीय अहवालानंतर पुन्हा त्या १२ जणांची पोलिस चौकशी करणार आहेत.

Web Title: atharv shinde murder case inquiry