आठवले गटाच्या उमेदवारांना मुंबईत यशाची हुलकावणी

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

मुंबई - भाजपबरोबर युती करून 19 जागा लढविणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचा (आठवले गट) एकही उमेदवार मुंबईत जिंकून आलेला नाही. त्याच्याउलट शिवसेनेबरोबर युती केलेल्या जनशक्‍ती रिपब्लिकन पक्षाला (अर्जुन डांगळे गट) राज्यात तीन जागांवर यश मिळालेले असल्याने शिवशक्‍ती आणि भीमशक्‍तीला कौल मिळत असल्याची प्रतिक्रिया जनशक्‍ती रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अर्जुन डांगळे यांनी व्यक्‍त केली आहे.

भाजपने रिपब्लिकन पक्षाला 25 जागा देण्याचे जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात 19 जागाच दिल्या, त्यातही सहा जागांवर बंडखोरी करत भाजपचेच उमेदवार उभे केले होते. रिपब्लिकन पक्षाच्या 12 जागांवरील उमेदवारासाठी भाजपच्या मतदारांनी मतदान केले नसल्याची प्रतिक्रिया "आरपीआय'चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांनी व्यक्‍त केली आहे. "सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, की भाजपने "आरपीआय'ला सोडलेल्या जागांवर बंडखोर उभे केले होते. भाजपने "आरपीआय'च्या उमेदवारांसाठी प्रचार केला नाही; मात्र बहुजन समाजाची मते भाजपला मिळावीत यासाठी "आरपीआय'ने प्रामाणिकपणे काम केले.

शिवसेनेबरोबर युती करत शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच निवडणूक लढविणाऱ्या जनशक्‍ती रिपब्लिकन पक्षाने मात्र शिवसेनेचे आभार मानले आहेत. अर्जुन डांगळे यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले, की शिवसेनेने राज्यभरात आमच्या पक्षासाठी सात जागा दिल्या आणि या सात जागांसाठी आमच्या मागे पक्षाची ताकद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उभी केली. शिवसेनेने मुंबईत आम्हाला सोडलेली एक जागाही आम्ही जिंकली. शिवशक्‍ती आणि भीमशक्‍तीला जनता स्वीकारत असल्याचा दावाही त्यांनी केला.

Web Title: athawale group candidates success dodge in Mumbai