चिप बसवलेल्या एटीएम कार्डांचेही क्‍लोनिंग!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

मुंबई - मॅग्नेटिक स्ट्रीप असलेल्या एटीएम कार्डचा डेटा कॉपी होत असल्यामुळे बॅंकांनी चिप बसवलेले नवे कार्ड ग्राहकांना वितरित केले; मात्र सायबर गुन्हेगारांनी या कार्डाचेही क्‍लोनिंग करण्याचा मार्ग शोधला आहे.

मुंबई - मॅग्नेटिक स्ट्रीप असलेल्या एटीएम कार्डचा डेटा कॉपी होत असल्यामुळे बॅंकांनी चिप बसवलेले नवे कार्ड ग्राहकांना वितरित केले; मात्र सायबर गुन्हेगारांनी या कार्डाचेही क्‍लोनिंग करण्याचा मार्ग शोधला आहे.

मॅग्नेटिक स्ट्रीप असलेल्या कार्डाच्या साह्याने होणाऱ्या क्‍लोनिंग प्रकरणांना आळा घालण्यासाठी ग्राहकांना चिप असलेले एटीएम कार्ड द्यावे, असे आदेश रिझर्व्ह बॅंकेने सर्व बॅंकांना दिले. मात्र आता सायबर गुन्हेगारांनी या चिपवरही मात केली आहे. चिप असलेल्या नव्या एटीएम कार्डाचेही क्‍लोनिंग करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी अंधेरी पोलिस सध्या तपास करीत आहेत. या प्रकरणातील तक्रारदार तरुणीने कोणताही ओटीपी क्रमांक आरोपींना सांगितला नसल्याचा दावा केला आहे. तक्रारदार तरुणी खासगी कंपनीत कामाला असून 30 मे रोजी सायंकाळी 5.10 वाजता हा प्रकार घडला. "माझ्याकडे चिप असलेले नवे कार्ड आहे. बॅंकेशी संपर्क साधला असता, आरोपींनी माझा डेटा कॉपी करून खात्यातून रक्कम काढल्याचा संशय आहे' असे ती म्हणाली. तिच्या खात्यातून ठाणे येथील एका एटीएममधून 40,700 रुपये काढण्यात आले. त्यानंतर तिने दुसऱ्या दिवशी अंधेरी पोलिसांकडे तक्रार केली. अंधेरीतील कार्यालयात असताना या तरुणीला तिच्या खात्यातून पैसे काढले जात असल्याचे संदेश आले होते. 5.14 वाजता चार मिनिटांत तिला सहा संदेश आले. त्यानंतर तिने बॅंकेशी संपर्क साधून तक्रार केली. बॅंकेने केलेल्या अंतर्गत चौकशीत तरुणीचा दावा खरा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बॅंकेने तिची रक्कम परत केली.

2012 ते 2017 (जूनपर्यंत)
राज्यातील सायबर गुन्हे

दाखल - 10,419
उकल - 3,167
अटक आरोपी - 5,655

चिप असलेल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे स्कीमिंग करण्यासाठी स्कीमरचा वापर केला जातो. असे स्कीमर ऑनलाइन उपलब्ध आहेत. त्यामुळे मॅग्नेटिक स्ट्रिप कार्डप्रमाणेच प्रतिबंधात्मक उपायांनी अशा सायबर गुन्ह्यांना आळा घातला जाऊ शकतो.
- ऍड. विकी शाह, सायबरतज्ज्ञ

ही काळजी घ्या...
- एटीएममध्ये पासवर्ड टाइप करताना हात ठेवा
- अनोळखी संदेशांना उत्तर देऊ नका
- ओटीपी क्रमांक कोणालाही सांगू नका
- अनोळखी कॉल आल्यास खासगी माहिती देऊ नका

Web Title: ATM Card Cloning cyber crime