ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला

Gunratna-Sadavarte
Gunratna-Sadavarte

मुंबई - मराठा आरक्षणाविरोधी याचिका दाखल करणारे ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना आज उच्च न्यायालयाच्या परिसरात मारहाण करण्यात आली. उच्च न्यायालयातील सुनावणी संपवून प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी सदावर्ते बाहेर आले होते. त्या वेळी जालनाचे रहिवासी असलेल्या वैद्यनाथ पाटीलने त्यांच्यावर हा हल्ला केला. वैजनाथ पाटीलला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले. सदावर्ते यांनी याबाबतची माहिती मुख्य न्यायाधीशांना दिली. झालेला प्रकार गंभीर आहे, असे नमूद करत, खंडपीठाने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी आणि ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांना बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी ऍड. सदावर्ते आणि याचिकाकर्ते जयश्री पाटील यांना संरक्षण देण्याचे आदेश दिले.

उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या विरोधी दाखल असलेल्या याचिकेवर मुख्य न्या. नरेश पाटील आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दोन्ही पक्षाच्या वकिलांची फौज, इतर सुनावणीचे वकील, विविध याचिकाकर्ते, सरकारी अधिकारी, कर्मचारी, सामान्य नागरिक, मराठा आरक्षण समर्थनार्थ आणि विरोधक यांमुळे कोर्ट रु. नं 52 खचाखच भरली होते. मुंगी शिरायलाही जागा नाही अशा परिस्थितीत आजची मराठा आरक्षणाची सुनावणी पार पडली.

राज्य सरकारने लागू केलेल्या मेगाभरतीबाबत हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तर न्यायालयाने सांगितले तर आम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल जाहीर करण्याचा विचार करू, पण तसे आताच आम्ही आश्‍वासन देऊ शकत नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली. या प्रकरणाला स्थगिती द्यावी, अशी ऍड. सदावर्ते यांची मागणी मात्र, खंडपीठाने तूर्तास अमान्य केली.

दरम्यान, गेल्या सोमवारपासून हजारहून अधिक धमक्‍या फोनवरून मिळाल्या आहेत, तसेच आपल्या घराची, कार्यालयाची रेकी केली जात आहे, काही अज्ञात व्यक्तींनी आपला पाठलाग केला असल्याची माहिती सदावर्ते यांनी खंडपीठाला दिली. दरम्यान, या प्रकरणी भोईवाडा पोलिसांत तक्रारही दाखल केल्याची माहिती त्यांनी केली असल्याची माहिती त्यांनी खंडपीठाला दिली. प्रसारमाध्यमांना सुनावणीची माहिती देण्यासाठी ते उच्च न्यायालयातील विद्यापीठासमोरील प्रवेशद्वाराजवळ आले. प्रतिक्रिया देऊन झाल्यानंतर पुन्हा न्यायालयात जाण्यासाठी वळताना, वैद्यनाथ पाटीलने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. ऍड. सदावर्ते यांची कॉलर पकडून हाताने ठोसे लगावले. दोन-चार ठोश्‍यामुळे सदावर्ते यांचा चष्मा खाली पडला. बेसावध असताना, अचानक झालेल्या हल्ल्यामुळे गुणवर्ते यांना प्रतिकार करता आला नाही; परंतु त्यांच्या सोबत असलेल्या काही वकिलांनी हा हल्ला परतावून लावला. त्यानंतरही "एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा वैद्यनाथ पाटील देतच होते. या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत, लगेचच वैजनाथ पाटीलला ताब्यात घेतले. काही प्रसारमाध्यमांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्या वेळी पाटील याने ऍड. सदावर्ते यांना अपशब्द वापरत, "एक मराठा लाख मराठा' या घोषणा सुरूच ठेवल्या.

सदावर्ते यांनीच प्रसिद्धी मिळविण्यासाठी हा हल्ला घडवून आणला आहे, असा दावा मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ काही कार्यकर्त्यांनी केल्याची चर्चा न्यायालयात उपस्थित असलेल्या मराठा आरक्षण समर्थनार्थ कार्यकर्ते कोल्हापूरचे दिलीप पाटील यांनी केला. वैद्यनाथ पाटील कोणासोबत आला होता का किंवा तो मराठा समर्थक संघटनेचा सदस्य होता का हे अद्याप उघड झाले नाही; परंतु जर यात तथ्य असेल तर त्याला कायदेशीर मदत देणार, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण कार्यकर्ते विनोद पाटील यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com