डीजे बंद करण्यास गेलेल्या पोलिसांवर दगडफेक; लाठीमार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

कोपरखैरणे - कोपरखैरणेतील सेक्‍टर 19 मध्ये एका हळदीच्या कार्यक्रमामध्ये मध्यरात्रीनंतरही मोठ्या आवाजामध्ये डीजे लावून धिंगाणा सुरू होता. हा डीजे बंद करण्यास गेलेल्या पोलिसांवर मद्यधुंद जमावाने दगडफेक करत वाहने फोडल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागल्याचा प्रकार गुरुवारी पहाटे घडला. यामध्ये दोन पोलिस व 5 जण जखमी झाले असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

कोपरखैरणे गावात राहणाऱ्या कुंदन म्हात्रे यांचा हळदीचा कार्यक्रम सुरु होता. रात्री अडीच तीन वाजेपर्यंत डीजेचा दणदणाट सुरू असल्याने परिसरातील नागरिकांनी कंट्रोल रूमला कळवले. त्याची दखल घेत गस्तीवर असलेल्या पोलिसांना या ठिकाणी पाठवण्यात आले. त्यांनी नवऱ्या मुलाकडील मंडळींना डीजे बंद करण्यास सांगितले. मात्र, कार्यक्रमातील मद्यधुंद मंडळींनी यास विरोध करत पोलिसांची गाडीही तेथून हलू दिली नाही. त्यामुळे गस्तीवरच्या पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले. यामुळे त्यांच्या मदतीसाठी जादाचे पोलिस बळ पाठविण्यात आले. हे पथक येताच जमावातील काही मद्यधुंद लोकांनी पोलिसांवर दगडफेक करत वाहनाचीही तोडफोड केली. या वेळी जमाव हिंसक होत असल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. या घटनेत नवरदेवाच्या आईसह पाच जण जखमी झाले आहेत.

Web Title: attack on police