टॅक्‍सीचालकावर जीवघेणा हल्ला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

वडाळा - ठाणे ते ग्रॅण्ट रोड असा परतीचा प्रवास सांगत टॅक्‍सीत बसलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी रविवारी सकाळी टॅक्‍सीचालकावर धारधार चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना चुनाभट्टी हायवे अपार्टमेंटसमोरील द्रुतगती मार्गावर घडली. यात टॅक्‍सीचालकाच्या कानावर, हातावर, पोटावर तसेच पायावर चाकूने वार करण्यात आले असून त्याच्या डाव्या हाताचा अंगठा कापला गेला आहे. याप्रकरणी शीव पोलिस ठाण्यात तीन अनोळखी आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.

गोवंडीतील शिवाजी नगर येथे राहणारे मोहम्मद शकील नसरुदीन कुरेशी (वय ३५) रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे टॅक्‍सी घेऊन निघाले. ठाण्याच्या तीन हात खांबा नाक्‍यावर टॅक्‍सी उभी करून मोहम्मद प्रवाशांची वाट पाहत असताना तीन व्यक्ती त्यांना ठाणे ते ग्रॅण्ट रोड आणि पुन्हा ठाणे असा प्रवास करायचा असल्याचे सांगत एक हजार रुपये भाडे ठरवून टॅक्‍सीत बसल्या. शीव-पनवेल मार्गावरून टॅक्‍सी चुनाभट्टीला पोहचली असता एका प्रवाशाने उलटी होत असल्याचा बहाणा केला. ते पाहून कुरेशी यांनी टॅक्‍सी थांबविली. टॅक्‍सी खराब होऊ नये म्हणून प्लॅस्टिकची बॅग देण्यासाठी कुरेशी टॅक्‍सीबाहेर आला असता दोघांनी त्याला मारहाण करीत मागच्या सीटवर ओढले. तिसरा व्यक्ती टॅक्‍सी चालवू लागला. ते पाहताच कुरेशी घाबरला आणि जाब विचारू लागला. संतापलेल्या इसमांनी चाकू काढून हल्ला केला. यात कुरेशी जखमी झाला. कुरेशीने आरडाओरड सुरू केल्याने चुनाभट्टी हायवे अपार्टमेंटजवळ आरोपी टॅक्‍सीचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने दुभाजकाला टॅक्‍सी ठोकली. अपघात झाल्याचे लक्षात येताच तिघांनी टॅक्‍सी सोडून घटनास्थळावरून पोबारा केला. दरम्यान, रक्तबंबाळ अवस्थेत पादचाऱ्यांनी मोहम्मद कुरेशीला शीव रुग्णालयात दाखल केले. काही दिवसांपूर्वी टॅक्‍सीच्या रांगेवरून झालेल्या क्षुल्लक कारणावरून हल्ला झाल्याचा संशय टॅक्‍सीचालक मोहम्द कुरेशी यांनी व्यक्त केला. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: attack on taxi driver