खालापुरात महिलेवर प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

परप्रांतीयांची वाढती दादागिरी खालापूर तालुक्‍यासाठी डोकेदुखी बनली आहे.

खालापूर (बातमीदार) : परप्रांतीयांची वाढती दादागिरी खालापूर तालुक्‍यासाठी डोकेदुखी बनली आहे. आठ दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलाला परप्रांतीयांनी कोंडून मारल्याची घटना घडली होती. त्यानंतर बुधवारी (ता. १३) खोपोली शिळफाटा येथे जाईबाई चंद्रकांत ढेबे (वय ४२) या महिलेवरही परप्रांतीयांनी चाकू हल्ला केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शिळफाटा येथून दोन किलोमीटर अंतरावर डोंगरावर मिळ धनगरवाडा आहे. या वाड्यात जाईबाई ही महिला राहते. त्या बुधवारी संध्याकाळी ६ वाजता कामावरून पायी जात असताना मिळगाव येथील शंकर मंदिराजवळ बसल्या होत्या. त्या वेळी अचानक तीन ते चार जणांनी अंधाराचा फायदा घेत त्यांच्यावर मागून धारदार चाकूने डोक्‍यात, मानेवर, तसेच डाव्या खांद्यावर हल्ला केला. अचानक घडलेल्या या घटनेने भेदरलेल्या जाईबाई यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आरडाओरड केला. त्या वेळी हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. आरडाओरड ऐकून आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी पोहचले. गंभीर जखमी झालेल्या जाईबाई यांना पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डोक्‍याला गंभीर दुखापत असल्याने प्राथमिक उपचारानंतर पुढील तपासणीसाठी त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालय हलवण्यात आले.

दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी अरुण राधा दास (बिहार, सध्या रा. खोपोली) या संशयिताला ताब्यात घेतले आहे. याशिवाय, अरसन सौदीउद्दीन आलम, औरंगजेब अताफ आलम, अली मैनुद्दीन शेख या तिघांची नावेही संशयितांमध्ये येत असून हे तिघेही मूळ बिहारमधील माधवपूरचे असल्याचे तपासात पुढे आले आहे. सध्या हे तिघे संशयित फरारी असून पोलिस शोध घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attack on woman in Khalapur