तरुणावर वार करून व रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न

दिनेश गोगी
बुधवार, 20 जून 2018

उल्हासनगर : चार वर्षेपुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आज सकाळी एका तरुणाला पकडून त्याला कोंडून आणि वार करून व रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न उल्हासनगर पोलिसांनी हाणून पाडला आहे. या प्रकरणी महिलेसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे.

उल्हासनगर : चार वर्षेपुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून आज सकाळी एका तरुणाला पकडून त्याला कोंडून आणि वार करून व रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न उल्हासनगर पोलिसांनी हाणून पाडला आहे. या प्रकरणी महिलेसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कॅम्प नं.2 येथील हनुमाननगर परिसरात नितीन उर्फ बापू शिंदे (38) हा आपल्या कुटूंबासह राहतो. तो बुधवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास लग्नाचा आहेर देण्यासाठी जात असतानाच, त्याच परिसरातील गल्लीत नितीन याला काही टोळीने अडवले.  पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून त्या  टोळीने त्याच्या डोळयात मिरची पुड टाकून त्याला बाबूलाल कुलाल याच्या घरात नेले. 

नितीन याला त्याठिकाणी कोंडून ठेवून संजू कुलाल, बाबूलाल कुलाल, रामपरवेज गुप्ता, शशिकांत कुलाल, संतोष कुलाल, सोनू कुलाल, यांनी त्यांच्याजवळील कोयता व चॉपरने नितीन याच्या डोक्यावर, खांदयावर व हातावर सपासप वार केले. तर रेणूका या महिलेने नितीन नितीनच्या अंगावर रॉकेल ओतून त्याला आग लावून पेटवण्याचा प्रयत्न करीत असतानाच,नितीनच्या नातलग महिलेने उल्हासनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन या घटनेची माहिती दिली.

तेंव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी, हवालदार तायडे, सोनवणे, बडगुजर, कॉन्स्टेबल साबळे, महाजन, यांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेऊन बाबूलाल कुलाल याच्या घराचा दरवाजा उघडून नितीन शिंदे याला जखमी अवस्थेत त्या घरातून बाहेर काढले. नितीन याला उपचारासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नितीन उर्फ बापू शिंदे याला जिवेठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याने दिलेल्या फिर्यादीवरून उल्हासनगर पोलिस ठाण्यात संजू कुलाल, बाबूलाल कुलाल, रामपरवेज गुप्ता, शशिकांत कुलाल, संतोष कुलाल, सोनू कुलाल व रेणूका या ७ जणांसह इतर काही अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 6 जणांना अटक केली असून इतरांचा शोध घेण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 4 वर्षांपूर्वी नितीन शिंदे याचे भांडण झाले होते. त्या भांडणात रामपरवेज याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याने त्यात तो जखमी झाला होता. याशिवाय संतोष कुलाल हा देखील जखमी झाला होता.  उल्हासनगर पोलिस ठाण्यात नितीन शिंदे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. तीन महिन्यापूर्वी नितीन सुटून आला होता. पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून या टोळीने हा प्रकार घडून आणला असल्याची माहिती तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी दिली.  

Web Title: An attempt to kill the youth and burn the kerosene