आता वीजबिले आकर्षक रंगात

आता वीजबिले आकर्षक रंगात

ठाणे - दर महिन्यात येणारे महावितरणचे बिल नव्या रंगात आणि सुटसुटीत माहितीसह वीजग्राहकांना मिळू लागले आहे. या वीजबिलावरील क्‍यूआर कोडच्या साह्याने अवघ्या एका क्‍लिकवरून महावितरणचे ॲप डाऊनलोड करण्याची सोय महावितरणने केली आहे. ॲन्ड्रॉईड, विन्डोज आणि आयओएस ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या मोबाईल ग्राहकांना क्‍यूआर कोडच्या साह्याने हे ॲप तत्काळ डाऊनलोड करणे शक्‍य होणार आहे, अशी माहिती महावितरणने दिली. 

महावितरणच्या वीजबिलाची रंगसंगती गेल्या अनेक वर्षांपासून एकसारखीच होती. त्याशिवाय अनेक प्रकारची महिती आणि जाहिरातींचा भरणा यामुळे नागरिकांना आवश्‍यक माहिती शोधावी लागत असे. एकाच रंगसंगतीत येणारे वीजदेयक बदलण्याच्या दृष्टीने महावितरणने प्रयत्न केला आहे. नव्या स्वरूपातील वीजबिल ग्राहकांना वितरित करण्यात येत असून जुन्या बिलाच्या तुलनेत ते सुटसुटीत; तसेच रंगसंगतीमुळे अधिकच आकर्षक झाले आहे. विशेष म्हणजे सद्यस्थितीत बारकोडपेक्षाही अधिक वापर असलेल्या क्‍यूआर कोड या वीजबिलावर आहे. याद्वारे महावितरणचे मोबाईल ॲप थेट डाऊनलोड करता येत आहे. मोबाईलधारकांनी स्मार्टफोनमध्ये असलेल्या किंवा डाऊनलोड करून घेतलेल्या क्‍यूआर कोड रीडरच्या माध्यमातून महावितरणच्या वीजबिलावरील क्‍यूआर कोड स्कॅन केला की थेट महावितरण मोबाईल ॲपची लिंक मिळत आहे.

१२ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांची पसंती...
महावितरणने विविध ग्राहक सेवा मोबाईल ॲपच्या माध्यमातून एका क्‍लिकवर उपलब्ध करून दिल्याने त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यात १२ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी महावितरण मोबाईल ॲप डाऊनलोड केले आहे. या ॲपमधून उच्च व लघुदाब (एलटी व एचटी) नवीन वीजजोडणीची मागणी करता येणे शक्‍य झाले आहे. चालू व मागील बिल पाहणे आणि त्याचा भरणा करण्यासाठी नेटबॅंकिंग, क्रेडिट / डेबिट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्डसचा पर्याय आहे; तर भरलेल्या पावतीचा तपशीलही देण्यात येत आहे. ॲपमधील टोल फ्री क्रमांकावरून कॉल सेंटरमध्ये संपर्काची व तक्रारी नोंदवण्याची सोय आहे, अशी माहिती महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com