लोहार चाळीत आली आकर्षक तोरणे

विविध प्रकारच्या दिव्यांची तोरणे
विविध प्रकारच्या दिव्यांची तोरणे

मुंबई : थ्रेड लाईट, कर्टन्स लाईट, मेटल लाईट, फेरी मेटल लाईट अशा वैविध्यपूर्ण दिव्यांच्या 300 ते 500 रुपयांत मिळणाऱ्या तोरणांनी लोहार चाळ झगमगत आहे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर लोहार चाळीमध्ये ग्राहकांची लगबग सुरू आहे. चिनी व भारतीय असे दोन्ही प्रकारचे दिवे येथे विक्रीस आहेत. परंतु, या वर्षी ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह जाणवत नाही. मंदीमुळे बाजारपेठ मंदावली आहे.
 
रंगीबेरंगी तोरण, लाईट, क्रिस्टल दिवे, लटकन दिवे अशा असंख्य प्रकारच्या दिव्यांचा लोहार चाळीत लखलखाट पसरला आहे. बरीच तोरणे एलईडी दिव्यांच्या स्वरूपात आढळू लागली आहेत.

या वर्षी बाजारपेठेत कर्टन्स लाईट, थ्रेड लाईट, फायबर बॉल्स अशा दिव्यांची नवीन तोरणे बाजारात आली आहेत. कर्टन्स लाईट "बबल्स'प्रमाणे दिसतात. या बबल्समध्ये रंगीबेरंगी छोट्या दिव्यांची डिझाईन केलेली आहे. त्यामुळे ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. थ्रेड लाईट लोकरीच्या धाग्यांच्या बॉल्सप्रमाणे वाटतात. व्हाईट मेटल लाईट मार्बलप्रमाणे दिसतात. त्यामध्ये सफेद, सोनेरी व रंगीबेरंगी छोटे दिवे आहेत. फायबर लाईट मखमली धाग्यांप्रमाणे दिसतात. या लाईटच्या तोरणांमध्ये लाल रंग अधिक उठून दिसतो. कंदील किंवा झुंबराप्रमाणे वन पीस असलेले पारदर्शी फेरी मेटल लाईट क्रिस्टल, गोलाकार आकारात उपलब्ध आहे. त्यामध्ये लावलेले छोट्या दिव्यांचे तोरण काही सेकंदांनुसार सुरू-बंद होते. या फेरी मेटल लाईटची किंमत 300 ते 400 रुपये आहे. त्याचबरोबर मेटल गोल्डन तोरण कंदील, पान, गोल अशा आकारांमध्ये उपलब्ध आहे. पाईप लाईटिंग तोरण असा नवीन प्रकारही आला आहे. हे पाईप पारदर्शी असून, त्यामध्ये छोटे छोटे दिवे सोडण्यात आले आहेत. या दिव्यांच्या तोरणांची लांबी पाच मीटर असून, ती 300 ते 500 रुपयांना उपलब्ध आहेत. नवीन प्रकारापेक्षा जुन्या रंगीबेरंगी तोरणांना ग्राहकांची मागणी आहे. 


बाजारपेठेवर मंदीचा परिणाम जाणवत आहे. नेहमीचे ग्राहक तोरण घेऊन जातात; परंतु ग्राहक कमी आहेत. ग्राहक ऑनलाईनवर डिझाईन बघतात; मात्र प्रत्यक्षात बाजारामध्ये ती डिझाईन उपलब्ध नसते. 
- देवदास टावरे, मॉडर्न प्लास्टिक दुकानदार 
 
मंदीमुळे बाजारपेठ थंडावली आहे. दिवाळी एक आठवड्यावर आली असली तरी ग्राहक नाही. सामान्य ग्राहक तोरण आणि दिवे घेऊन जातात. पूर्वी याच वेळी दुकानांमध्ये गर्दी होई; पण आता दुकानात दिवसभरात 10 ते 12 ग्राहक येतात. 
- गुडडू चौरसिया, गेट लाईट दुकानदार 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com