शवदाहिनी हस्तांतराच्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्‍तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

सिडकोचा ७४ लाखांचा खर्च; पालिकेचे दुर्लक्ष

मुंबई : खारघरमध्ये सिडकोने ७४ लाख रुपये खर्च करून उभारलेल्या गॅस शवदाहिनीला सिलेंडरची जोडणी करण्यात आली आहे. तसेच ही शवदाहिनी पालिकेच्या ताब्यात घेवून जनतेसाठी खुली करावी, असे पत्र सिडकोने सहा महिन्यांपूर्वी पनवेल पालिका प्रशासनास देऊनही पालिका त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

शहरीकरणामुळे झाडे कमी होत आहेत. अग्नि दिल्‍यानंतर होणारा धूर तसेच राख तलाव किंवा नदीत टाकली जाते. त्यातून होणारे प्रदूषण या सर्व बाबींचा विचार करून सिडकोने खारघर सेक्‍टर १४ मधील स्मशानभूमीत अत्याधुनिक पद्धतीची गॅस शवदाहिनीचा प्रकल्प उभारला आहे. सिडकोने ७४ लाख रुपये खर्च करून गॅस शवदाहिनी उभारून सहा महिने झाले. शवदाहिनीला लागणारी सिलेंडरची जोडणीही करण्यात आली असून शवदाहिनी पालिकेच्या ताब्यात घ्यावी, असे पत्र सिडकोने पालिकेला देवून सहा महिने झाले; मात्र पालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. 

शवदाहिनी प्रकल्पाचे काम डोबिंवली येथील चिरंतन उद्योगाने केले असून यासाठी सर्व भारतीय यंत्रसामुग्री वापरण्यात आली आहे. सिडको आणि पनवेल पालिका आयुक्तांसमवेत एप्रिल महिन्यात शवदाहिनी हस्तांतराच्या बाबतीत बैठक झाली होती; मात्र आजमितीस हस्तांतर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. 

लाकडांअभावी नागरिकांची फरपट
सहा महिन्यांपूर्वी येथील स्मशानभूमीत लाकूडफाटा उपलब्ध नसल्यामुळे एका परिवाराला मृतदेह थेट नवी मुंबई पालिकेच्या बेलापूर येथील स्मशानभूमीत न्यावा लागला होता. खारघरमध्ये स्मशानभूमीत लाकडे मिळत नसल्यामुळे मृतदेह बाहेर घेवून गेल्याचे प्रकरण उजेडास आल्यावर खारघरमधील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. 

शवदाहिनीला लागणारी गॅस जोडणी करून पनवेल पालिकेने हस्तातंतर करून घ्यावे, असे पत्र पालिकेला देण्यात आले होते. पुन्हा स्मरणपत्र दिले जाणार आहे.
- अरुण अनुसे, कार्यकारी अभियंता, सिडको


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awaiting for transfer