गिधाड संवर्धनाचा जागर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 September 2019

गणेशोत्सव हे सामाजिक प्रबोधनाचे उत्तम माध्यम असल्याचे महाडच्या सीस्केप संस्थेने दाखवून दिले आहे. विनती ऑरगॅनिक्‍स हाऊसिंग कॉलनीच्या गणेशोत्सवात संस्थेने भाविकांना गिधाड संवर्धनाचा संदेश दिला.  

महाड (बातमीदार) : गणेशोत्सव हे सामाजिक प्रबोधनाचे उत्तम माध्यम असल्याचे महाडच्या सीस्केप संस्थेने दाखवून दिले आहे. विनती ऑरगॅनिक्‍स हाऊसिंग कॉलनीच्या गणेशोत्सवात संस्थेने भाविकांना गिधाड संवर्धनाचा संदेश दिला.  

जागतिक गिधाड संवर्धन दिनाच्या निमित्ताने सीस्केप संस्थेने विनती ऑरगॅनिक्‍स हाऊसिंग कॉलनीच्या गणेशोत्सवात गिधाड संवर्धन स्लाईड शो आयोजित केला होता. त्यावेळी कंपनीचे उपाध्यक्ष महेश पुरोहित, व्यवस्थापकीय अधिकारी शांतीनंदन कुलकर्णी, अन्य अधिकारी-कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.  

या स्लाईड शोमध्ये महाड परिसरातील पक्षी, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी व अन्य वन्यजीवांची ओळख सीस्केप संस्थेचे मीत डाखवे व प्रणव कुलकर्णी यांनी करून दिली. बगळे, करकोचे व मुग्धबलाक आदी पाणथळीतील पक्षी घरटी करण्यासाठी देशभरातून महाड परिसरात येतात. या घरट्यांचे संवर्धन व संरक्षण करण्याचे महत्त्व योगेश गुरव, ओम शिंदे यांनी समजावून सांगितले. पाणथळीतील पक्षी, जंगलातील पक्षी आणि माळरानातील पक्षी यांच्या संख्येवर शिकारी पक्ष्यांचे अस्तित्व अवलंबून असते.

गरूड व गिधाडे या पक्ष्यांच्या संवर्धन प्रकल्पाबद्दल प्रबोधन करण्यात आले.पक्ष्यांच्या नोंदीची सूची तयार करण्यापासून जागतिक स्तरावरील गिधाड संवर्धन प्रकल्प उभारणीचे काम अशा सीस्केपच्या कार्याचा महाडकर म्हणून आम्हाला अभिमान वाटतो, असे गौरवोद्‌गार पुरोहित यांनी काढले. अशा संस्थांच्या कार्यामुळे भविष्यात निसर्गसंपदा टिकून राहील, असा विश्‍वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला. 

कीटक नियंत्रणासाठी पक्षी उपयुक्त 
भातशेतीतील अळ्यांवर कीटकनाशकांची फवारणी करण्यापेक्षा बगळे, वंचक, खंड्या, नीळकंठ, हरितालक, वेडा राघू आदी पक्ष्यांचे संवर्धन केल्यास कीटकांचा नाश नैसर्गिकरित्या करता येतो. कीटक व अळ्या हेच या सर्व पक्ष्यांचे प्रमुख खाद्य आहे, असे सीस्केप संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness of eagle