बालकामगार मुक्तीसाठी विरारमध्ये जनजागृती फेरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

नालासोपारा : पालघर जिल्हा बालकामगारमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभागाकडून शनिवारी (ता.१६) शाळकरी मुलांची जनजागृती फेरी काढण्यात आली.

नालासोपारा : पालघर जिल्हा बालकामगारमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभागाकडून शनिवारी (ता.१६) शाळकरी मुलांची जनजागृती फेरी काढण्यात आली. या वेळी बालकांचा हक्क अबाधित ठेवा, कोणत्याही १८ वर्षांखालील किशोरवयीन मुलांना कामावर ठेवू नका, कामाच्या नादात त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका, असा सामाजिक संदेश फेरीद्वारे देण्यात आला.

महाराष्ट्र सरकारच्या बालकामगार विभागातर्फे ७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान पालघर जिल्ह्यात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर वसई-विरारचे दुकान निरीक्षक नितीन पोतदार यांच्या पुढाकारातून विरार पूर्व कारगील परिसरात शनिवारी (ता.१६) जनजागृती फेरी काढण्यात आली. यात कारगीलनगर येथील जयदीप शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका यांनी सहभाग नोंदविला.

१४ वर्षांखालील बालकांना कोणत्याही व्यवसाय प्रक्रियेवर कामावर ठेवणे गुन्हा आहे. मालकाने, बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवले, तर सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत शिक्षा, तसेच २० ते ५० हजारपर्यंत दंड होऊ शकतो, हा संदेश घेऊन मुले आणि पालकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी ही फेरी काढून ‘चला, पालघर जिल्हा बालकामगारमुक्त करूया’, असे आवाहनही करण्यात आले. फेरीसाठी अंगणवाडी सेविका सुहासिनी पाटील यांनी परिश्रम घेतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Awareness round in Virar for the liberation of child labor