‘...यासाठी’ दोनशे वर्षे जुन्या झाडांवर कुऱ्हाड!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

खोपोली-पेण या राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या विकासकामाच्या आड येणाऱ्या सुमारे अनेक लहान-मोठ्या वृक्षांवर कुऱ्हाड कोसळली आहे. विशेष म्हणजे यामध्ये सुमारे २५० पेक्षा अधिक वडाच्या झाडांचा समावेश असून हे अनेक वृक्ष तब्बल २०० वर्षांपेक्षा अधिक जुने आहेत. 

खालापूर : खोपोली-पेण या राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या विकासकामाच्या आड येणाऱ्या सुमारे अनेक लहान-मोठ्या वृक्षांवर कुऱ्हाड कोसळली आहे. विशेष म्हणजे यामध्ये सुमारे २५० पेक्षा अधिक वडाच्या झाडांचा समावेश असून हे अनेक वृक्ष तब्बल २०० वर्षांपेक्षा अधिक जुने आहेत. 

हे वाचलं का? : वेश्यागमनाचे सोंग करून आला अन् हत्या करून गेला

खोपोली-पेण मार्ग हा सुमारे ३० किलोमीटर लांबीचा आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गाचा हा मध्यबिंदू आहे. त्यामुळे त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते. डोंगर, टेकड्या आणि खिंडीतून जाणाऱ्या मार्गावर भविष्यात वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामात अडथळा ठरणारी वड, पिंपळ यांसारखी अनिर्बंधित झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये काही १०० ते २०० वर्षांपेक्षा जुनी आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्गातील ७५ पेक्षा अधिक झाडे तोडण्यात आली आहेत. वन विभागाने आंबा, जांभूळ, मोह यासारखी निर्बंधित झाडे तोडण्यास काही भागात अद्याप परवानगी दिली नाही. वनसंपदेवरील हा घाला पर्यावरणप्रेमींना अस्वस्थ करत आहे. त्यामुळे याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

खोपोली-पेण मार्गावरील निर्बंधित झाडे अद्याप तोडण्यात आली नाहीत; तर अनिर्बंधित झाडे तोडण्यासाठी परवानगीची आवश्‍यकता नसते. या मार्गावरील गागोदे-वाकृळ खिंडीत सुमारे १०२ 
झाडे आहेत.
- घनश्‍याम आडकर, वनाधिकारी, पेण.

खोपोली-पेण मार्गावरील खिंडीत मोठी वनसंपदा आहे. पक्षी, प्राणी यांचा हा अधिवास आहे. त्यामुळे खिंडीतून मार्ग तयार करताना कमी वृक्षतोड व्हावी, असे वाटते. 
- विजय भिकोट, वरसई, पेण.

५० वर्षांपेक्षा अधिक काळ खोपोली-पेण मार्गावरून प्रवास करतोय. मार्गावर अनेक दुर्मिळ वनस्पती आहेत. आजोबा वनौषधींसाठी या भागात येत होते. ही झाडे तोडली तर पर्यावरणाचे नुकसान होणार आहे. हे दुर्दैवी आहे.
- राजू आत्माराम सावंत, पेण.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The ax on two hundred year old trees