अयोध्येत सेनेची तलवार म्यान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

मुंबई - अयोध्येत जाऊन राममंदिर निर्माण केले जात नसल्याबद्दल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारण्यासाठी निघालेल्या शिवसेनेला उत्तर प्रदेशात मात्र तलवार म्यान करून जावे लागणार आहे. २५ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन कोणतीही सभा घेऊन भाजपवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित न करता केवळ मंदिराच्या आजूबाजूचे रहिवासी, स्थानिक साधू महंत आणि रामलल्लाचे दर्शन घेऊन परतणार आहेत.

मुंबई - अयोध्येत जाऊन राममंदिर निर्माण केले जात नसल्याबद्दल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारण्यासाठी निघालेल्या शिवसेनेला उत्तर प्रदेशात मात्र तलवार म्यान करून जावे लागणार आहे. २५ नोव्हेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन कोणतीही सभा घेऊन भाजपवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित न करता केवळ मंदिराच्या आजूबाजूचे रहिवासी, स्थानिक साधू महंत आणि रामलल्लाचे दर्शन घेऊन परतणार आहेत.

महिनाभरापूर्वी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाऊन राममंदिर निर्माण करण्यात विलंब होत असल्याबाबत पंतप्रधानांना जाब विचारणार असल्याचे जाहीर केले होते. दसरा मेळाव्यात उद्धव यांनी त्यांच्या संपूर्ण भाषणात मोदींवर कठोर शब्दांत टीका केली होती. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या आमदार, खासदारांसह अयोध्येचा दौरा केला. या वेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. या वेळी उद्धव ठाकरे यांना सुरक्षा मिळावी याविषयी चर्चा झाल्याचे समजते; तसेच उद्धव यांच्यासमवेत राज्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येत २५ नोव्हेंबरला पोचणार असल्याने त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सभा होणार होती; मात्र या सभेला सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी देण्यात आली नसल्याचे शिवसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून समजते.

उद्धव ठाकरे २४ नोव्हेंबरला अयोध्येत पोचणार आहेत. रामजन्मभूमी न्यासचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांच्यासह अन्य महंतांची भेट घेणार आहेत. सायंकाळी शरयू नदीवर आरती करणार आहेत. २५ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता ते रामल्लाचे दर्शन घेतील. त्यानंतर गुलाबबाडी मैदानात महाराष्ट्रातून गेलेल्या रामभक्‍तांसमवेत स्थानिकांशी जनसंवाद करणार आहेत.

दौऱ्यापूर्वीच झटका
अयोध्येतील कार्यक्रमासाठी दिलेले निमंत्रण अखिल भारतीय आखाडा परिषदेने धुडकावल्याने शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. आखाडा परिषदेशी संबंधित कोणीही शिवसेना तसेच विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत, असे परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी स्पष्ट केले आहे. या नेत्यांना रामापेक्षा राजकारणात अधिक रस आहे. या दोन्ही संघटना केवळ प्रचार आणि राजकारणासाठी अयोध्येत कार्यक्रम करीत आहेत, अशी टीका गिरी यांनी केली आहे.

साधू-महंतांची भेट आणि स्थानिकांशी संवाद असाच आमचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. त्यामुळे अयोध्येत सभा होणारच नव्हती.
- संजय राऊत, शिवसेना खासदार

Web Title: Ayodhya Shivsena Meeting Uddhav Thackeray Politics