'बीडीएस'ऐवजी आयुर्वेदिकला पसंती 

'बीडीएस'ऐवजी आयुर्वेदिकला पसंती 

मुंबई, ता. 5 : एकेकाळी एमबीबीएसनंतर दंत (बीडीएस) अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा असे; परंतु यंदा एमबीबीएसनंतर आयुर्वेदिक अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यामुळे दंत अभ्यासक्रमाच्या काही जागा शिल्लक राहिल्या आहेत. 

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देशपातळीवर घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत पात्र ठरलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया राज्य सामाईक सीईटी सेलमार्फत राबवण्यात आली. एमबीबीएस, दंत शास्त्र, आयुर्वेदिक, होमिओपॅथी आदी अभ्यासक्रमांसाठी झालेल्या नीट परीक्षेत पात्र ठरलेल्या सुमारे साडे चार लाख अर्जदारांनी अर्ज केले. यापैकी सुमारे 69 टक्के विद्यार्थ्यांनी एमबीबीएस आणि आयुर्वेदिक अभ्यासक्रमाला पसंती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यंदा विद्यार्थ्यांनी दंत अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे विविध कोट्यातील या अभ्यासक्रमाच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. 

एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थी दुसरी पसंती दंत शल्य अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला देत असत; परंतु केंद्र सरकारने आयुर्वेदिक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना ऍलोपथीचा सराव करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी एमबीबीएसला प्रवेश न मिळाल्यास आयुर्वेदिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास पसंती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

आयुर्वेदिक, होमिओपॅथी आदी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आयुष मंत्रालयाने 15 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया राबवण्यास मुदतवाढ दिली आहे. यंदाच्या प्रवेश परीक्षेत एमबीबीएसनंतर विद्यार्थांनी आयुर्वेदिकला पसंती दिल्याचे चित्र आहे; परंतु प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याबाबतची माहिती स्पष्ट होईल. 
- आनंद रायते, सीईटी सेल अध्यक्ष 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com