राज्यातील पहिल्या वातानुकूलित पोस्ट कार्यालयाची दुरावस्था !

bad condition of the first air conditioned post office in the state
bad condition of the first air conditioned post office in the state

ठाणे : राज्यातील पहिले वातानुकुलीत पोस्ट कार्यालय असे शेखी मिरवणाऱ्या ठाणे पूर्वेकडील कोपरी पोस्ट कार्यालयाची पुरती दुरवस्था झाली आहे. या कार्यालयातील संपूर्ण वातानुकुलीत यंत्रणाच ठप्प झाली असून हवा आतबाहेर येण्याजाण्यासाठी एक्झॉस्ट फॅनचीदेखील व्यवस्था नसल्याने कर्मचाऱ्यांचा श्वास कोंडला जात आहे. अशा वातवरणात एखाद्या टपाल कर्मचाऱ्याच्या किंबहुना ग्राहकाच्या जीवावर बेतल्यास कोण जबाबदार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जगभरात संगणकीय युग अवतरल्याने शासकीय कार्यालयेही टेक्नोसेव्ही बनू लागली.याच पार्श्वभूमीवर, पोस्ट विभागही कात टाकू लागला असून ठाणे, पूर्व विभागाचे राज्यातील पहिले वातानुकुलीत पोस्ट कार्यालय तीन वर्षापूर्वी 13 जुलै 2016 ला सुरु करण्यात आले. कोपरीतील अष्टविनायक चौक येथील सद्गुरू गार्डन गृह संकुलातील मेरीगोल्ड इमारतीच्या तळघरात (बेसमेंट) हे टपाल कार्यालय असून या कार्यालयाचे  उद्घाटन सार्वजानिक बांधकाममंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले होते. टपाल कार्यालय वातानुकुलीत असल्याने सुरवातीला सर्वांनाच याचे अप्रूप वाटले. मात्र, मागील तीन महिन्यापासून या कार्यालयातील चारही जुनाट पद्धतीची वातानुकुलीत यंत्रे बंद पडली असल्याने कोंदट वातावरणात कर्मचारी कामाचा उरक करीत आहेत. या कार्यालयात हवेसाठी फॅन आहेत परंतु,एकही एक्झॉस्ट फॅन नसल्याने शुद्ध हवेची वानवा जाणवते.अशा तक्रारी येथील कर्मचारी दबक्या आवाजात करीत आहेत.

कोपरी पोस्ट कार्यालयात 4 महिलासह एकूण 24 कर्मचारी असून अनेकजण निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. तर सुमारे 25 हजाराच्या आसपास खातेधारक असून यातील 2 हजार निवृत्ती वेतनधारक ज्येष्ठ नागरिक आहेत.दररोज सुमारे अडीचशे ते 300 ग्राहक कामानिमित्त या पोस्ट कार्यालयात येत असतात. परंतु, कार्यालयातील वातावरणच कोंदट असल्याने दुर्दैवाने इथे, एखादा कटू प्रसंग उद्भवल्यास कोण जबाबदार? असा सूर ग्राहकांमध्ये उमटत आहे. 

जुने पोस्ट कार्यालय स्टेशनजवळील मंगला हायस्कूलसमोर होते. महापालिकेने ही इमारत अतिधोदायक ठरवल्याने शिवसेना खासदार राजन विचारे यानी पोस्टाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी भेट घेउन कार्यालय तत्काळ सद्गुरू गार्डन येथील भाड्याच्या तुटपुंज्या जागेत स्थलांतरित केले होते.मात्र,सध्या या वातानुकुलीत कार्यालयाची दुरवस्था बनली आहे. काही महिन्यापूर्वीच येथून दीड लाखांची रोकड भामट्याने लंपास केली होती. तरीही, अद्यापही कार्यालयात सीसी टीव्ही यंत्रणा बसवलेली नाही. कार्यालय बेसमेंटमध्ये असल्याने ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करताना गैरसोयीचे बनले आहे.

याबाबत ठाणे टपाल विभागाच्या अधीक्षिका रेखा रिझवी यांना संपर्क साधला असता त्यांच्या स्वीय सचिवांनी सहा. अधीक्षक डी. टी. फणसे यांना संपर्क साधण्यास सांगितले. फणसे यांनी पोस्ट कार्यालयातील समस्याबाबत तेथील पोस्ट मास्तरांनी अहवाल पाठवणे गरजेचे असल्याचे सांगून माध्यमांना माहिती देण्यास असमर्थतता दर्शवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com