पळचिल आरोग्य केंद्राला ग्रहण

पोलादपूर : भग्‍न अवस्‍थेत उभी असलेली पळचिल येथील आरोग्‍य केंद्राची नवी इमारत.
पोलादपूर : भग्‍न अवस्‍थेत उभी असलेली पळचिल येथील आरोग्‍य केंद्राची नवी इमारत.

पोलादपूर (बातमीदार) : पोलादपूर तालुक्‍यातील पळचिल या आरोग्य केंद्राची इमारत नव्याने बांधण्यात आली असून अद्याप ती अर्धवट अवस्थेत आहे. या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने उद्‌घाटन होण्यापूर्वीच ती नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या नवीन इमारतीमध्ये शेवाळ, झुडपे वाढले असून, सर्प व विंचू, कुत्र्यांचे आश्रयस्थान झाले आहे. त्यामुळे लाखो रुपयांच्या इमारतीवर झालेल्या खर्चावर पाणी फिरल्याचे दिसून येत आहे. याशिवाय, या आरोग्य केंद्रासाठी २२ मंजूर पदांपैकी १७ पदे भरली असून पाच पदे ही रिक्तच आहेत. 

पोलादपूर तालुक्‍यात दोन आरोग्य केंद्रे आहेत. मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या पळचिल येथे एक केंद्र आहे. तर दुसरे पितळवाडी येथे असून त्याच्या अधिपत्याखाली आठ उपकेंद्रे आहेत. तालुक्‍यातील गावे दुर्गम भागात असल्याने तिसरे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे गरजेचे आहे. पळचिल प्राथमिक केंद्राच्या नवीन इमारतीचे काम अर्धवट झाल्याने आजही शाळेच्या इमारतीमध्ये हे केंद्र अनेक वर्षांपासून सुरू आहे. पळचिल आरोग्य केंद्राची नवीन इमारत आ वासून उभी असली, तरी सुमार दर्जाच्या कामामुळे अनेक खोल्यांची दुरवस्था झाली आहे. या इमारतीवर आजपर्यंत लाखो रुपये खर्च झाले आहेत. या इमारतीचे भूमिपूजन तत्कालीन मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते; मात्र याकडे अनेक वर्षे दुर्लक्ष झाल्याने ही इमारत मरणावस्थेत उभी असल्याचे दिसून येत आहे.

२०१५-१६ या कालावधीत जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून पळचिल आरोग्य केंद्राच्या संरक्षक भिंतीसाठी १० लाख रुपयांचा निधी खर्च मंजूर झाला होता. काम पूर्ण होऊन ही इमारत गळती व तुटलेली तावदाने, नादुरुस्त दरवाजे आदी कामांमुळे उद्‌घाटनापासून वंचित आहे. मात्र, याकडे तालुका लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षासह आरोग्य केंद्राच्या उदासीनतेमुळे हे काम रखडले आहे. या आरोग्य केंद्रामध्ये अत्यावश्‍यक सुविधांसह यंत्रसामग्री असणे आवश्‍यक असून, वेळीच इमारतीची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा, विंचू, सापांसह मोकाट गुरांसाठी हे निवारा केंद्र बनले जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पळचिल या केंद्रांतर्गत पाच उपकेंद्रे आहेत. यापैकी कुडपण येथील केंद्र असून नसल्यासारखे आहे. जागेअभावी इमारत नसल्याने या ठिकाणी डॉक्‍टर, कर्मचारी जाण्यास तयार नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तर पैठण, धामनदेवी, संवाद, तुर्भे या केंद्रांवर ग्रामस्थ आरोग्य सेवेचा लाभ घेत असतात. जनसुरक्षा, लसीकरण आदींसह इतर आरोग्य सेवा राबविण्यात येत आहेत. काही महिन्यांत पळचिल आरोग्य केंद्रातून ओपीडी बाह्यरुग्णाच्या १३०८ नोंदी झाल्या आहेत, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
काही महिन्यांपूर्वी या केंद्रातील वैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्यामुळे हे केंद्र कधी बंद, तर कधी सुरू असायचे. यामुळे ग्रामस्थ थेट पोलादपूर शहरातील ग्रामीण रुग्णालय किंवा खासगी दवाखान्याची वाट धरत होते. आता ही पदे भरण्यात आलेली आहेत. या केंद्रात पुरेसा औषधसाठा असून, श्‍वान दंश, विंचू, सर्प दंश लसचाही पुरेसा साठा आहे.

पळचिल आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त होती पण सर्वांच्या पाठपुराव्याने बरीच पदे भरण्यात अली आहेत व अनेक नागरिक केंद्रात उपचाराचा लाभ घेत आहेत कोणत्याही प्रकारची साथ नाही. मात्र नवीन इमारत लवकरात लवकर होणे गरजेचे आहे त्यासाठी पाठपुरावा देखील चालू आहे.
- डॉ. गुलाबराव सोनावणे, तालुका आरोग्य अधिकारी 

पळचिल आरोग्य केंद्रातील मंजूर पदे
वैद्यकीय अधिकारी    २
आरोग्य सहायक     १
आरोग्य सहायिका     २
आरोग्य सेवक     ३
आरोग्य सेविका     ४
औषध निर्माता     १
कनिष्ठ सहायक     १
शिपाई     ३
रिक्‍त पदे
आरोग्य सेवक     २
आरोग्य सेविका     १
शिपाई     २

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com