स्थानक परिसराने घेतला मोकळा श्‍वास 

मयुरी चव्हाण काकडे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

कल्याण - एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पूल दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेच्या उपनगरी स्थानक परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या दुर्घटनेला एक वर्ष उलटले असले, तरी आजही बहुतेक स्थानकांच्या परिसरात फेरीवाल्यांनी ठाण मांडल्याचे आढळते; परंतु बदलापूर स्थानक परिसर आठ महिन्यांपासून फेरीवालामुक्त आहे. गर्दीच्या वेळी स्थानकात येणे आणि जाणे सहज शक्‍य होत असल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत. 

कल्याण - एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पूल दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेच्या उपनगरी स्थानक परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या दुर्घटनेला एक वर्ष उलटले असले, तरी आजही बहुतेक स्थानकांच्या परिसरात फेरीवाल्यांनी ठाण मांडल्याचे आढळते; परंतु बदलापूर स्थानक परिसर आठ महिन्यांपासून फेरीवालामुक्त आहे. गर्दीच्या वेळी स्थानकात येणे आणि जाणे सहज शक्‍य होत असल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

ठाणे आणि डोंबिवली या शहरांनंतर सुशिक्षित, सुसंस्कृत, नोकरदारांचे शहर अशी बदलापूरची ओळख आहे. तिसरी मुंबई म्हणून नावारूपाला येत असलेल्या या शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळीच नव्हे; तर नेहमीच प्रवाशांचे लोंढे स्थानकाबाहेर पडत असतात. स्थानक परिसरात, विशेषत: बदलापूर पूर्वेला स्कायवॉकच्या खाली बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना वाट काढणे कठीण झाले होते. अनेकदा धक्काबुक्कीचे प्रकार घडत असत. अनेक प्रवासी या फेरीवाल्यांकडूनच खरेदी करत असल्याने गर्दी आणि गोंधळात भर पडत असे. 

बदलापूरमधील रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत या ठिकाणीही एल्फिन्स्टन रोडसारखी दुर्घटना घडू शकते, अशी चर्चा जागरूक बदलापूरकरांमध्ये समाजमाध्यमांवरून सुरू झाली. त्यानंतर नगरपालिका, रेल्वे पोलिस, शहर पोलिस, आरपीएफ यांनी एकत्रितपणे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. कारवाईमधील सातत्यामुळे सुमारे आठ महिन्यांपासून बदलापूरमधील नागरिकांना सहजगत्या स्थानकात येणे आणि बाहेर पडणे शक्‍य होत आहे. या पार्श्‍वभूमीवर जवळच असलेल्या अंबरनाथ स्थानकाचा परिसर कधी फेरीवालामुक्त होणार, अशी विचारणा नागरिक करत आहेत. 

राजकीय दबावाचा अभाव 
बदलापूर स्थानकाबाहेरून हटवलेल्या फेरीवाल्यांना पुन्हा त्याच जागी बसवण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दबाव आणला नाही. त्यामुळेच फेरीवाल्यांच्या विळख्यातून सुटका शक्‍य झाली, असे मत लोकप्रतिनिधींनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. या कारवाईत राजकीय हस्तक्षेप न झाल्याबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. 

दृष्टिक्षेपात 
- फेरीवाले गेल्यामुळे स्थानक परिसरात स्वच्छता. 
- आरपीएफ, जीआरपी कर्मचाऱ्यांचे सदोदित लक्ष. 
- स्कायवॉकवर सुरक्षा रक्षक तैनात, बाजार बंद. 

सर्व यंत्रणा एकत्र आल्यामुळेच फेरीवालामुक्ती शक्‍य झाली आहे. रेल्वे कर्मचारी स्थानक परिसरात देखरेख करत असल्याने फेरीवाले बसत नाहीत. बदललेले चित्र पाहून इतर शहरांतील नागरिकही कौतुक करत आहेत. 
- संजय मेस्त्री, नागरिक 

कोणत्याही चांगल्या गोष्टीत येणारा अडथळा हा प्रत्यक्ष-अप्रक्षपणे राजकीय क्षेत्राशी निगडित असल्याचे बोलले जाते. म्हणूनच फेरीवाल्यांवर सतत होणारी कारवाई आणि मोकळा झालेला स्थानक परिसर, हे चित्र समाधानकारक आहे. 
- ऍड्‌. तुषार साटपे, नागरिक 

Web Title: Badlapur Station is free for hawkers