बागलकरांची महापौरपदाची संधी हुकली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

टेंडर मतांबाबत 20 तारखेला सुनावणी

टेंडर मतांबाबत 20 तारखेला सुनावणी
मुंबई - समान मते मिळाल्याने ईश्‍वरी चिठ्ठीद्वारे घेण्यात आलेल्या कौलात पराभूत म्हणून घोषित झालेले शिवसेनेचे उमेदवार सुरेंद्र बागलकर यांची महापौरपदाची संधी हुकली आहे. पाच टेंडर मतांबाबत लघुवाद न्यायालयात 20 मार्चला सुनावणी होणार आहे. महापौरपदाची निवडणूक त्यापूर्वीच होणार असल्याने निकाल बाजूने लागला तरी बागलकर यांच्या गळ्यात या पदाची माळ पडू शकत नाही.

पालिका निवडणुकीसाठी दक्षिण मुंबईतील कुंभारवाडा येथील प्रभाग 220 मध्ये झालेल्या मतदानात बागलकर आणि भाजपचे अतुल शहा यांना समान मते (5946) पालिका निवडणुकीत मिळाली. त्यामुळे ईश्‍वरी चिठ्ठीचा कौल घेऊन विजयी उमेदवाराचे नाव जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहा यांच्या बाजूने कौल आल्याने ते विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले; मात्र या प्रभागात पाच टेंडर मते असल्याने ती उघडण्यासाठी बागलकर यांच्या वतीने ऍड. बाळकृष्ण जोशी यांनी लघुवाद न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यावर 20 मार्चला सुनावणी होणार आहे.

महापौरपदासाठी तगडे दावेदार म्हणून बागलकर यांच्याकडे पाहिले जाते. ते गिरगावचे असल्याने तसेच त्यांच्या नावाला कोणाचाही विरोध होण्याची चिन्हे कमी असल्याने, त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता अधिक होती. पाच टेंडर मतांपैकी तीन मते मिळाल्यास त्यांना विजयी घोषित केले जाऊ शकते; मात्र महापौरपदाची निवडणूक 8 मार्चला होणार असल्याने त्यांची संधी हुकली आहे.

टेंडर मत म्हणजे काय?
एखाद्या मतदाराकडे सर्व पुरावे असतील, पण त्याच्या नावावर आधीच कुणी तरी मतदान केले असल्यास संबंधित मतदाराला मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान करता येते. त्यास टेंडर मत असे म्हणतात. ही मते न्यायालयातच उघडली जाऊ शकतात. त्यामुळे बागलकर यांनी लघुवाद न्यायालयात दावा दाखल केला आहे.

Web Title: bagalkar ruined the opportunity Mayor