अन् बाहुबली पोलिसाने वाचविले वृध्दाचे प्राण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

- ओढ्यात वाहत चाललेल्या एका ज्येष्ठास 'बाहुबली स्टाईलने एका पोलिसाने वाचविल्याचा प्रकार समोर आला आहे
- बेशुद्ध असलेल्या त्या व्यक्तीस हातात धरून पाण्याबाहेर ओढले. 'बाहुबली'सारखे त्या व्यक्तीस खांद्यावर घेऊन अखेर बाहेर आणले.

गोरेगाव :  ओढ्यात वाहत चाललेल्या एका ज्येष्ठास 'बाहुबली स्टाईलने एका पोलिसाने वाचविल्याचा प्रकार समोर आला आहे. गोरेगावच्या आरे दुग्ध वसाहतीचे युनिट क्रमांक 5 मध्ये शुक्रवारी दुपारी उशिरा मोठ्या ओढ्यात एक व्यक्ती वाहून गेल्याचा फोन स्थानिक लोकांनी आरे पोलिस स्टेशनला केला. पोलिस स्टेशनकडून फिरत्या गस्तीसाठी असलेल्या वाहन क्रमांक 1 ला कॉल देण्यात आला. सदर पोलिस गस्त वाहन तत्काळ युनिट पाच नंबरकडे पोहोचले. स्थानिकांकडून जुजबी माहिती घेवून ओढ्याच्याकडेने शोधाशोध सुरू केली. 

पावसाचा जोर थांबला असला तरी, डोंगरावरील पाणी मोठ्या प्रमाणावर अद्यापही वाहून येत असल्याने ओढ्यात पाण्याचे धारेला जोर होता. अचानक एक व्यक्ती पाण्यात वाहून येत असल्याचे पोलिसांनी दिसले. पाण्याचा जोराचा प्रवाह बघून पोलिसांनाही त्या व्यक्तीस कसे वाचवावे असा प्रश्न पडला. मात्र पोलीस विशाल नाना पाटील याने कुठलाही विचार न करता पाण्यात उतरला. बेशुद्ध असलेल्या त्या व्यक्तीस हातात धरून पाण्याबाहेर ओढले. 'बाहुबली'सारखे त्या व्यक्तीस खांद्यावर घेऊन अखेर बाहेर आणले. त्या ज्येष्ठ नागरिकास जोगेश्वरीचे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती स्थिर असून शनिवारी, रविवारी घरी सोडणार असल्याचे कळते. 

दरम्यान, पोलिस विशालने दाखवलेल्या प्रसंगावधानामूळे एक जीव वाचला असून उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप सावंत, आरे पोलिस स्टेशनचे व.पी.नी. नूतन ठाकूर व अन्य सहकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले. वरिष्ठ अधिकारी विशालचा यथोचित सत्कार करणार असल्याचे समजते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bahubali police rescue elderly man