शिल्लक रकमेची स्लिप देण्याची एसटीच्या तिकीट यंत्रात सोय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

प्रवाशांबरोबरच बसवाहकही अनभिज्ञ
मुंबई - एसटी बसमध्ये वाहकाकडे तिकिटाचे उरलेले सुटे पैसे नसतील तर त्याऐवजी शिल्लक रकमेची परतावा स्लिप देण्याची सोय इलेक्‍ट्रॉनिक तिकीट यंत्रात आहे; मात्र एसटी महामंडळाने याची प्रसिद्धीच न केल्यामुळे या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.

प्रवाशांबरोबरच बसवाहकही अनभिज्ञ
मुंबई - एसटी बसमध्ये वाहकाकडे तिकिटाचे उरलेले सुटे पैसे नसतील तर त्याऐवजी शिल्लक रकमेची परतावा स्लिप देण्याची सोय इलेक्‍ट्रॉनिक तिकीट यंत्रात आहे; मात्र एसटी महामंडळाने याची प्रसिद्धीच न केल्यामुळे या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे.

पूर्वीच्या कागदी तिकिटांच्या काळात अशी रक्कम शिल्लक राहिली तर वाहक तिकिटाच्या मागे लिहून देत असे; मात्र या पद्धतीत गोंधळ होत असल्याने इलेक्‍ट्रॉनिक यंत्रांमध्ये नंतर अशी विशेष सोय करण्यात आली. इलेक्‍ट्रॉनिक तिकीट यंत्रे 2008च्या सुमारास एसटीमध्ये आली, त्यानंतर काही वर्षांनी अशी सोय करण्यात आली. त्यानुसार अशी रक्कम शिल्लक राहिली तर यंत्रावरील विशिष्ट बटणे दाबल्यावर प्रवाशाच्या तिकिटाचा क्रमांक तेथे भरावा लागतो. त्यानंतर उरलेल्या रकमेचा आकडा भरल्यावर परतावा स्लिप बाहेर येते. ज्या आगारातील तिकीट असेल तेथील रोखपालाला ती स्लिप दिल्यावर प्रवाशाला रक्कम मिळते.

महामंडळाने या योजनेची माहिती बस वाहकांनाही पुरेशा प्रमाणात दिलेली नाही. त्यामुळे काल-परवापर्यंत काही वाहक इलेक्‍ट्रॉनिक तिकिटाच्या मागे जुन्या पद्धतीप्रमाणे हातानेच रक्कम लिहून देत असत. नुकतीच काही डेपो व्यवस्थापकांना या परतावा स्लिपची माहिती कळल्यावर त्यांनी वाहकांना त्याबाबत शिक्षण देण्यास सुरुवात केली; मात्र एसटी महामंडळाने या योजनेची प्रसिद्धी का केली नाही, असा प्रश्‍न कामगार संघटना विचारत आहेत.

या योजनेनुसार उरलेली रक्कम केवळ संबंधित आगारातूनच मिळू शकते. हा परतावा महिनाभरातच घेता येतो. ही स्लिप मिळाली की पुन्हा वाहकाला ती परत देऊन उरलेली रक्कम मागता येत नाही. यासाठी आपण त्या आगाराच्या जवळपास असणे आवश्‍यक आहे; मात्र या योजनेमुळे वाहकाकडील जादा रकमेची नोंद यंत्रणेत राहत असल्याने ही पद्धत सर्वांसाठीच योग्य आहे. त्यामुळे अजूनही या योजनेची पुरेशी प्रसिद्धी करावी, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: balance amount slip in st ticket system