मनसेच्या अहवालावर बाळासाहेबांचे छायाचित्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

मुंबई - मनसेचे दादर येथील नगरसेवक सुधीर जाधव यांनी कार्यअहवालावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांची छायाचित्रे छापल्यामुळे शिवसेनेने त्यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे.

नगरसेवक जाधव यांनी मतदारांना भेटवस्तू वाटल्याचा आरोपही शिवसेनेचे शाखाप्रमुख यशवंत विचले यांनी तक्रारीत केला आहे. जाधव यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे. "आपण भेटवस्तू वाटलेल्या नाहीत. कार्यअहवालात सर्वच लोकनेत्यांची छायाचित्रे आहेत. त्यात बाळासाहेब आणि त्यांच्या पत्नी मीनाताई यांचीही छायाचित्रे आहेत. ते आपल्यासाठी मातृतुल्य आहेत,' असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेने राजकीय सूडबुद्धीने आरोप केल्याचे प्रत्युत्तरही त्यांनी दिले आहे.

जाधव यांनी मागील निवडणुकीपूर्वी शिवसेनेतून मनसेत प्रवेश केला होता. आता त्यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका स्नेहल जाधव निवडणूक लढवणार आहेत.

Web Title: Balasaheb thackeray photo on mns report