ठाण्यात प्लास्टिकबंदीचे तीनतेरा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नदी-नाल्यांमध्ये सर्वाधिक साचणाऱ्या कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण जास्त आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका पोहोचत असल्याने प्लास्टिकबंदीची आरोळी राज्यस्तरावरून ठोकण्यात आली होती; पण ही प्लास्टिकबंदीची घोषणा केवळ आरंभशूर ठरून, ठाण्यातही या बंदीचा बोजवारा उडाला आहे. विशेष म्हणजे २० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा सर्रास वापर सुरू झाला आहे. मात्र कारवाईबाबत प्रभागस्तरीय अधिकारी ढिम्म असल्याचे चित्र आहे.

ठाणे : नदी-नाल्यांमध्ये सर्वाधिक साचणाऱ्या कचऱ्यात प्लास्टिकचे प्रमाण जास्त आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका पोहोचत असल्याने प्लास्टिकबंदीची आरोळी राज्यस्तरावरून ठोकण्यात आली होती; पण ही प्लास्टिकबंदीची घोषणा केवळ आरंभशूर ठरून, ठाण्यातही या बंदीचा बोजवारा उडाला आहे. विशेष म्हणजे २० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा सर्रास वापर सुरू झाला आहे. मात्र कारवाईबाबत प्रभागस्तरीय अधिकारी ढिम्म असल्याचे चित्र आहे.

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्लास्टिकबंदीची ‘राणा भीमदेवी’ थाटात घोषणा केली होती. त्याचा धसका घेऊन सर्वच दुकानदारांनी आपल्या दुकानांतून प्लास्टिक पिशव्या हद्दपार केल्या. मुळात मोठ्या दुकानांतून मिळणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा पुनर्वापर होत होता. त्याउलट फेरीवाले अथवा किरकोळ व्यापाऱ्यांकडून वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा पुनर्वापर होत नव्हता. कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांना पायबंद घालणे अपेक्षित असताना फेरीवाल्यांकडील प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सर्रास वाढला आहे.

गणेशोत्सव काळात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केल्यास कठोर कारवाईचा इशारा महापालिकेकडून देण्यात आला होता; पण त्याची अंमलबजावणी न झाल्याने तो ‘फुसका बार’ ठरला आहे. सध्या ठाण्यात प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर सुरू आहे. सकाळी जांभळी नाका परिसरात घाऊक भाजीविक्रेत्यांचा मोठ्या प्रमाणात बाजार भरतो. त्या वेळी शहरातील इतर किरकोळ भाजीविक्रेते; तसेच ग्राहक मोठ्या संख्येने येथे येतात. या किरकोळ विक्रेत्यांना येथील घाऊक विक्रेते भाजी सर्रास कमी जाडीच्या पिशव्यांमधून देताना आढळतात. तसेच हा बाजार साडेआठनंतर बंद होतो. त्यानंतर या परिसरात प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच पडल्याचे चित्र आढळते; पण हा खच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिसत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

आवश्‍यक योजनांचे केवळ कागदी घोडे
गेल्या वर्षी प्लास्टिकबंदीची लाट आल्यानंतर महापालिकेने कारवाईचा धडाका लावला होता. अगदी रस्त्यावरून प्लास्टिक पिशवी कोणी घेऊन जात असल्यास त्यांना हटकले जात होते. त्याचबरोबर फेरीवाल्यांमध्ये प्लास्टिकबंदीची जागृती होण्यासाठी त्यांना महापालिकेकडून कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले होते. तसेच नागरिकांना प्लास्टिकऐवजी पर्यायी पिशव्या उपलब्ध करून देण्यासाठी नगरसेवक निधी वापरण्याची तयारी करण्यात आली होती; पण या साऱ्या योजना केवळ ‘कागदी घोडे’ ठरल्या आहेत. 

प्लास्टिकबंदी अंमलात आणण्याच्या सक्त सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. ठराविक विभागांत प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आल्यास, त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले जातील. कमी जाडीच्या पिशव्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे.
- संदीप माळवी, उपायुक्त, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ban of Plastic in Thane get tintera