केळी, ड्रॅगन फ्रूटला जिल्ह्यात बहर

रोहा : केळीचे घड वाहून नेताना सुरेश शेणॉय.
रोहा : केळीचे घड वाहून नेताना सुरेश शेणॉय.

रोहा (बातमीदार) : रायगड जिल्हा हा पारंपरिक भातशेती आणि अल्प प्रमाणात कडधान्य लागवड करणारा जिल्हा असला, तरी सध्या नव-शेतकाऱ्यांचा कल फळझाडे लागवडीकडे आहे. त्यामुळेच ओसाड वरकस जमिनीवर पपई, केळी, ड्रॅगन फ्रूटसारख्या फळझाडांना बहर आला आहे. 

रोहा तालुक्‍यातील वडाची वाडी गावात सुरेश शेणॉय या शेतकऱ्याने गेल्या वर्षी ५ एकरवर केळीची बाग तयार केली. एकरी १ हजार ८०० झाडे लावली आहेत. मे २०१९ पासून त्यांनी उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे. प्रति एकर ३० टन उत्पादन निघत असल्याचे शेणॉय यांनी सांगितले. पहिल्या हंगामात ३ लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज व्यक्त केला. 

गौळवाडी येथील श्रीनिवास सत्या यांनी ३ एकर जागेवर ३ हजार ड्रॅगन फ्रूटची रोपे लावली आहेत. वर्षभरात उत्पादन सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी एकरी १ लाख ३० हजार रुपये खर्च झाला आहे. दरवर्षी एकरी १ ते दीड टन उत्पादन निघण्याची शक्‍यता त्यांनी वर्तवली. किरकोळ ड्रॅगन फ्रूटला एका टनास २ लाख रुपये भाव मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

ड्रॅगन फ्रूट लागवडीत त्यांनी पपईचे आंतरपीक घेतले आहे. त्यापासून मासिक १५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे वार्षिक उत्पन्नात दुप्पट वाढ होत आहे. 

जिल्ह्यातील अनेक शेतकरी पारंपरिक आंबा, काजू पिकाव्यतिरिक्त कलिंगड, बोरे आदी फळे, सजावटी फुले आणि नारळ, मिरी, हळद लागवडीकडे वळले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पारंपरिक भातशेतीत उत्पन्न परवडणारे नसते. त्यामुळे नावीन्यपूर्ण उत्पन्न घेण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे कलिंगड लागवडीकडे वळलो आहे.
- अनंत मगर, प्रगतशील शेतकरी  

केळी उत्पादन फायदेशीर आहे. तालुकास्तरावर सुविधा उपलब्ध झाल्यास शेतकरी अधिक नफा घेऊ शकतील.
- सुरेश शेणॉय, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com