जेवणाचा, विश्रांतीचा ठिकाणा नाही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

बॅंक कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था; सहनशीलतेचे कौतुक

मुंबई - पाचशे, हजारच्या नोटा बंद केल्याने बॅंक व एटीएम केंद्रांवर ग्राहकांच्या रांगा आणि दुसरीकडे बॅंक कर्मचाऱ्यांना पाणी प्यायलाही वेळ नाही, असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. नोटांची व्यवस्था करण्यासाठी बॅंक कर्मचाऱ्यांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. त्यातही शाखेत जुन्या नोटांचा खच आणि नवीन नोटांचा तुटवडा, अशा कात्रीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांनी चार दिवस संयमाचे आणि सहनशीलतेचे दर्शन घडवले. शाखा व्यवस्थापकांना तर आता समुपदेशनाचेही काम पार पाडावे लागत आहे.

बॅंक कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था; सहनशीलतेचे कौतुक

मुंबई - पाचशे, हजारच्या नोटा बंद केल्याने बॅंक व एटीएम केंद्रांवर ग्राहकांच्या रांगा आणि दुसरीकडे बॅंक कर्मचाऱ्यांना पाणी प्यायलाही वेळ नाही, असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. नोटांची व्यवस्था करण्यासाठी बॅंक कर्मचाऱ्यांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. त्यातही शाखेत जुन्या नोटांचा खच आणि नवीन नोटांचा तुटवडा, अशा कात्रीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांनी चार दिवस संयमाचे आणि सहनशीलतेचे दर्शन घडवले. शाखा व्यवस्थापकांना तर आता समुपदेशनाचेही काम पार पाडावे लागत आहे.

बॅंक कर्मचाऱ्यांना सर्व सुट्यांचा आनंद उपभोगता येतो. नोटा रद्द केल्यापासून बॅंक कर्मचारी अथक काम करून लोकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. जेवणाचा, विश्रांतीचा ठिकाणा नाही, अशा स्थितीत लोकांची गर्दी किंवा रोकड संपेपर्यंत त्यांनी काम सुरू ठेवले. ग्राहकांच्या समस्यांना शाखा व्यवस्थापकांना तोंड द्यावे लागत आहे. ग्राहकांना त्यांच्याच हक्काचे पैसे देऊ शकत नाही आणि कर्मचाऱ्यांना जेवणाचीही उसंत देता येत नाही. एखाद्या वर व वधू पित्याने लग्नाची पत्रिका दाखवून पैसे मागितल्यावर व्यवस्थापक थेट जेवण-सजावटीच्या कंत्राटदारांना दूरध्वनी करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही थोडीफार रक्कम गाठीशी पाहिजे, ही ग्राहकांची मागणी ते नाकारूही शकत नाहीत. काही ग्राहकांनी थेट रुग्णालयातून चिठ्या आणल्या आणि अधिक पैशांची मागणी केली. ग्राहकांची पैशांविना केविलवाणी अवस्था, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांकडून जादा काम करवून घेणे, अशा दोन्ही आघाड्या त्यांना सांभाळाव्या लागत आहेत.
बॅंक कर्मचारी तर घड्याळाकडे न पाहताच काम करीत आहेत. सकाळी लवकर आल्यानंतर घरी परत कधी जाणार हे त्यांनाही माहीत नाही. कोणीही सांगण्याच्या आणि ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. आपली चिडचिड ग्राहकांना न दाखवता त्यांनी सौजन्य जपले. काही ग्राहक रिझर्व बॅंकेचा फतवा सांगून 10 हजारांची मागणी करतात. त्यांना ग्राहकांची होणारी गैरसोय समजावून सांगण्याची जबाबदारीही कर्मचाऱ्यांवर येऊन पडली आहे.

एका शाखा व्यवस्थापकाचा अनुभव त्याच्याच शब्दांत...
नऊ तारखेला लोकांसाठी बॅंका बंद असल्या तरी आम्ही वेळेवर शाखेत आलो. कार्यक्षेत्रातील सर्व शाखा व एटीएममधील पाचशे, हजारच्या नोटा काढून पाठवून दिल्या. रात्री नऊ वाजल्यापासून शाखांना नव्या व 100, 50 च्या नोटा पाठविण्याचे काम सुरू झाले. रात्री दीड वाजता शेवटची गाडी रोकड घेऊन गेली. शेवटी रोकड पाठवली तेथील व्यवस्थापकाचीही अशीच अवस्था होती. जवळपास 40 ते 50 शाखांना रोकड पाठवली. या धांदलीत जेवायला 12 वाजले. हिशोब आटपून अडीच वाजता दुचाकीने घरी निघालो. विरारला राहणारे रात्री शाखेतच झोपले व पाच वाजता घरी जाऊन आंघोळ करून लगेच आठ वाजता परतले.

गुरुवारी (ता. 10) लोकांची गर्दी होणार असल्याने अन्य कामे कमी करून त्या माणसांना कॅश काऊंटरवर बसवले. कॅश काऊंटर सायंकाळी सात वाजता बंद केले. हिशोब होईपर्यंत रात्रीचे दहा वाजले. दुपारचे जेवण तीन, रात्रीचे 11.30 वाजता अशी अवस्था होती. शुक्रवारीही गर्दी वाढल्याने सर्व कर्मचाऱ्यांना 15 तास काम करावे लागले. प्रत्येक जण पडेल ते काम करत होता. विभागीय व्यवस्थापक करन्सी चेस्टमध्ये येऊन सर्वत्र लक्ष ठेवत होते.

लोकांमध्ये घबराट पसरल्याने गोंधळ वाढला. शंभरच्या नोटा चलनात आहेत त्या तेवढ्याच राहिल्या. मात्र लोकांनी एकाच वेळी मागणी केल्याने पेच उद्‌भवला. आता लोक नेहमीसारखे वागतील तेव्हा हा पेच संपेल. अशा आणीबाणीच्या प्रसंगी लोकांची सेवा करता आली, याचे समाधान वाटले.

Web Title: bank employee working