बॅंकेच्या फसवणुकीचा प्रयत्न फसला 

crime
crime

मानखुर्द - केंद्र सरकारने काळ्या पैशांविरोधातल्या निर्णयामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील आहेत. विक्रोळीत एनकेजीएसबी बॅंकेच्या शाखेत दुसऱ्याच्या ओळखपत्रावर पैसे बदली करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जयेश जैन (वय 34) असे त्याचे नाव आहे. बॅंक व्यवस्थापकाच्या सतर्कतेमुळे जयेशचा प्रयत्न फसला असून, भांडुप पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. 

सर्वच बॅंकांमध्ये जुन्या नोटा जमा करण्यासाठी खातेदारांची गर्दी होत आहे. मर्यादेपेक्षा जास्त भरणा होणाऱ्या खात्यांवर आयकर विभागाची नजर आहे. ते टाळण्यासाठी दुसऱ्याच्या ओळखपत्रावर खात्यात पैसे जमा करायला आलेल्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी (ता. 10) दुपारी एनकेजीएसबी बॅंकेच्या विक्रोळी शाखेत जयेश जैन हा अनिरुद्ध तिवारी यांचे आधार कार्ड स्वतःचे असल्याचे सांगत नोटा बदलून घेण्याचा प्रयत्न करत होता. तिवारी बॅंकेचे नियमित ग्राहक असल्याने बॅंक कर्मचाऱ्यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी व्यवस्थापक पूनम पोखरकर यांना हे कळवले आणि जयेशने आणलेली कागदपत्रे त्यांना दाखवली. पोखरकर यांनी आपण तिवारी यांना ओळखत असल्याचे सांगताच जयेशने कागदपत्रे तिथेच सोडून पोबारा केला. त्यानंतर तिवारी यांना बॅंकेत बोलावण्यात आले. त्यांच्याकडे आधार कार्ड होते. त्याची प्रत आधार कार्ड वितरकाच्या दुकानात असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिस आणि तिवारी त्या दुकानात गेले. ती वितरण एजन्सी जयेशचीच असल्याचे समजले. त्याच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. 

जयेशला फोन करून पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. भांडुप पोलिसांनी त्याला अटक केली. बॅंक व्यवस्थापक पूनम पोखरकर यांनी जयेशविरोधात बॅंकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची कायदेशीर तक्रार केली आहे. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक विजय कावळे करत असल्याची माहिती भांडुप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीपत काळे यांनी दिली. 

कर्मचाऱ्यांची दक्षता 

दोन दिवसांपासून बॅंक कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. या ताणातही कर्मचाऱ्यांनी आणि बॅंक व्यवस्थापकांनी दाखवलेली सर्तकता कौतुकास्पद आहे. त्यांच्या सर्तकतेमुळे तिवारी यांचा धोका टळला आहे. बॅंकेची फसवणुकीचा प्रयत्नही फसला आहे. आता अशा घटना वाढण्याची शक्‍यता असल्याने बॅंक कर्मचाऱ्यांनी सर्तक राहण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com