कर्ज वसुलीसाठी बॅंकेने धमकावले 

ठाणे : बँकेचे कर्मचारी यांना जाब विचारताना मनसे कार्यकर्ते.
ठाणे : बँकेचे कर्मचारी यांना जाब विचारताना मनसे कार्यकर्ते.

ठाणे : कर्ज वसुलीसाठी फोन करून अश्‍लील भाषेत धमकावणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मनसेच्यावतीने सोमवारी वागळे इस्टेट येथील कोटक महिंद्र बॅंकेच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धमकावणाऱ्यांमध्ये एका महिलेचा समावेश असून या महिलेला पाठीशी घालणाऱ्या रिकव्हरी मॅनेजरला तसेच संबंधित महिलेला हजर करा, अशी मागणी करत या कार्यालयाच्या बाहेरच मनसेने ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान, सोमवारी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी वागळे इस्टेट येथील  श्रीनगर पोलिस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बोरिवली येथे राहणारे संजय आव्हाड आणि मनीषा आव्हाड यांनी कोटक महिंद्रा कंपनीचे क्रेडिट कर्ज घेतले होते. त्यांची 30 हजारांची रक्कम शिल्लक असल्याने वागळे इस्टेट येथील कर्ज वसुली कार्यालयातील एका क्रमांकावरून त्यांच्या मुलीला, पत्नीला आणि मुलाला दूरध्वनी आला. यामध्ये वसुली करणाऱ्या महिलेने अश्‍लील भाषेत त्यांना धमकावल्याचे संजय आव्हाड यांचे म्हणणे आहे.

आव्हाड यांचा मुलगा डिप्रेशनमध्ये असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे मुलावर उपचार पूर्ण झाल्यानंतर पैसे भरण्याचे आव्हाड यांनी कबूल केल्यानंतरही वसुली करणारे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याने त्यांनी बोरिवली येथील पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. 

मात्र सायबर सेलमधून कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने त्यांनी ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना हा सर्व प्रकार सांगितला. हा सर्व प्रकार समजल्यानंतर मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे हे त्यांच्या काही कार्यकर्त्यांना तसेच महिला कार्यकर्त्यांना घेऊन वागळे इस्टेट येथील कोटक महिंद्राच्या कार्यालयावर गेले. बॅंकेच्या बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच धमकावणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेर कार्यकर्त्यांच्या समोर आणण्याची मागणी केली.

मात्र बराच वेळ केवळ कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांकडून आश्‍वासन देण्यात आले, तर मनसे कार्यकर्ते त्याचठिकाणी बसून राहिले. मात्र बराच वेळ होऊनही धमकी देणारी महिला आणि रिकव्हरी मॅनेजर न आल्याने कार्यकर्ते तिथून निघाले. दरम्यान, आव्हाड कुटुंबीयांनी न्याय मिळाला नाही तर आत्मदहनाचा इशारा दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

कर्ज वसुलीचे काम खासगी एजन्सीमार्फत केले जाते. या प्रकरणाची पडताळणी करून संबंधित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. 
- तन्मय सावंत, बँक उपाध्यक्ष
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com