सचिन अहिरांच्या शिवसेना प्रवेशावरून बॅनरयुद्ध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

अहिर यांनी कोणालाही आपल्या पक्षांतराची कुणकुण लागणार नाही, याची काळजी घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेतेही अंधारात राहिले. अहिर यांच्या समर्थकांनाही याबाबत कल्पना नव्हती. काल रात्री अचानक बैठक घेऊन अहिर यांनी आपला निर्णय जाहीर केला.

मुंबई : शरद पवारांची साथ सोडून मुंबई राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर हे आज सकाळी 11 वाजता मातोश्रीवर शिवबंधनात अडकणार आहेत. जनतेच्या सेवेसाठी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची बॅनरबाजी अहिर समर्थकांनी मुंबईत केली आहे.

अहिर यांनी कोणालाही आपल्या पक्षांतराची कुणकुण लागणार नाही, याची काळजी घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेतेही अंधारात राहिले. अहिर यांच्या समर्थकांनाही याबाबत कल्पना नव्हती. काल रात्री अचानक बैठक घेऊन अहिर यांनी आपला निर्णय जाहीर केला. त्यानंतर लगेच बॅनरबाजी करण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अहिर यांची ही गद्दारी असल्याची टीका सोशल मिडियातून सुरू केली आहे.

अहिर हे शरद पवारांचे मुंबईतील `ब्लू आइड बाॅय` होते. ते राष्ट्रवादीकडून वयाच्या 27 व्या वर्षी आमदार झाले. त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात पक्षाने स्थान दिले होते. पुण्याचे पालकमंत्रिपद त्यांना देण्यात आले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला. तरी त्यांच्याकडे मुंबईची जबाबदारी पक्षाने कायम ठेवली होती. तरीही ते पक्षावर नाराज का झाले असावेत, याची दोनतीन कारणे सांगण्यात येत आहेत.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीची मुंबईतील जबाबदारी नवे खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे देणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे मुंबईत पक्ष आपल्याकडील पद काढून घेईल, याची शक्यता अहिर यांना दिसत होती. दुसरीकडे वरळीतून राष्ट्रवादीकडून पुन्हा निवडून येण्याची खात्री त्यांना नव्हती. तेथे आता शिवसेनेचे सुनील शिंदे हे विद्यमान आमदार आहेत. वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामुळे येथेच सेनेकडून उमेदवारीसाठी अहिर प्रयत्न करतील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सचिन अहिर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मला तुमची कायम साथ लाभली आहे अशीच साथ पुढे कायम ठेवा. यापुढे आपल्याला अधिक ताकदीने लढायचे आहे असे म्हणत सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले. तसेच रात्रीच्या सुमारास त्यांच्या स्वीय सचिवांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आज सकाळी अकरा वाजता मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

या सगळ्या घडामोडींमुळे सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश निश्चित मानला जातोय. सचिन अहिर हे राष्ट्रवादीचा मुंबईतील चेहरा मानला जातात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी जर शिवसेनेत प्रवेश केला तर तो राष्ट्रवादीसाठी सर्वात मोठा धक्का ठरणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहिर यांना रोखण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र ते अयशस्वी ठरल्याचे दिसते आहे. आज सकाळी ११ वाजता सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: banner war on sachin ahir s entry in Shivsena