महापालिकेच्या नावाने गुजरातीमध्ये बॅनरबाजी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

ठाण्यातील  पारसिक रेतीबंदर या गणपती विसर्जन घाटावर भक्तांसांठीच्या सूचना या मराठीऐवजी  गुजरातीत लावण्यात आल्या आहेत. 

ठाणे : गेली पंधरा वर्षे शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाणे पालिकेचे मराठीपेक्षा गुजराती भाषेवर अधिक प्रेम असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. पारसिक रेतीबंदर येथे गणेश विसर्जनासाठी भक्तांना आवाहन करणारे बॅनर महापालिकेने चक्क गुजराती भाषेत लावल्याने या चर्चेला उधान आले आहे. या सर्वांमुळे संतंप्त मराठी भक्तांनी तर येथील काही फलकही उखडून फेकून दिले आहेत. तर मनसेने या विषयावर मनसेच्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

तसेच ठाणे शहर गणेशोत्सव समन्व्य समितीनेही या प्रकारचा निषेध केला आहे. संबधित प्रकार समजताच पारसिक रेतीबंदर येथे गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष समीर सावंत यांनी इतर पदाधिकाऱ्यांसह धाव घेतली. यावेळी त्यांना येथे गुजराती भाषेतील फलक आढळल्यानंतर त्यांनी तत्काळ ते उखडून टाकले. हे फलक म्हणजे मराठी भाषेवर केलेले आक्रमक असल्याचे संतप्त मत देखील त्यांनी व्यक्त केले.

ठाणे पालिकेच्यावतीने मुंब्रा रेतीबंदर गणेश घाट येथे गणेश मुर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी पालिकेने गणेश भक्तांना आवाहन करणारे फलकही लावले आहेत. मात्र हे फलक चक्क गुजराती भाषेत लावण्यात आले असल्याने गणेश विसर्जनासाठी आलेल्या मराठी भाषिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या फलकावर पालिकेचे चिन्ह असून फलक लावल्यानंतर असे फलक नागरिकांच्या नजरेत येईपर्यंत महापालिका प्रशासन झोपले होते का, असा प्रश्न उपस्थित केला
जात आहे. 

दरम्यान महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मात्र या विषयावर सावध पवित्रा घेतला आहे. ठाणे महापालिका गुजराती भाषेत बॅनर लावण्याची शक्‍यता नसल्याचे त्यांनी सांगितले. काही संस्थांनी पंधरा हजार वडापाव वाटप करण्यासाठी मंडप बांधण्याची परवानगी मागितली होती. कदाचित त्यांनी हा फलक लावला असावा, मात्र तरीसुध्दा पालिकेने हे बॅनर लावले आहे का, याची माहिती घेऊन चौकशी करणार असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banners in Gujarati by the name of Municipal Corporation